२६ ऑगस्टपासून गडचिरोलीत महाआरोग्य शिबिर-डाॅ.रुडे

0
22

गडचिरोली,दि.२३: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २६ ते २९ ऑगस्ट असे चार दिवस वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.डॉ.अनिल रुडे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १५ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ५० वैद्यकीय तपासणी व उपचार महाशिबिरे घेण्यात येणार आहेत. गडचिरोली येथील शिबिरात पहिल्या दिवशी रोगनिदान, तपासणी, उपचार व नंतरच्या दिवशी शस्त्रक्रिया आणि त्यांच्यावर उपचार केले जातील. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे इस्पितळातील विशेषज्ज्ञांमार्फत ही तपासणी होणार आहे.

कर्करोग, ह्दयरोग, बालरोग, दंत व मुख रोग, नाक, कान, घसा, अस्थिरोग, डोळे, प्रसूती इत्यादी तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. याच शिबिरात ह्दयरुग्णांच्या इसीजी, सोनोग्राफी, इको, टीएमटी, प्रयोगशाळा तपासण्या केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व पथकांतर्गत गावांमधील रुग्णांना रुगणवाहिकांद्वारे शिबिरासाठी आणण्यात येणार असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या नेतृत्वात रुग्ण आणण्याचे काम होणार आहे. आलेल्या रुग्णांची भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. या शिबिरात ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत ‘ई- गोल्डन’ कार्डांचे वाटपही करण्यात येणार आहे. आतापर्यंत १ लाख ४८ हजार कुटुंबांपैकी ५४ हजार कुटुंबांना असे कार्ड वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ.रुडे यांनी दिली.

विशेष म्हणजे, या शिबिरात येणारे कॅन्सर वॉरिअर्स हे २०१७ पासून जिल्ह्यात तपासणी व उपचारासाठी येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु झालेल्या किमोथेरपीचा लाभ आतापर्यंत ४८ रुग्णांनी घेतल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी किलनाके, दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ.नंदू मेश्राम उपस्थित होते.