वाशिम, दि. २८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यावतीने २६ ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा व युवा संसद कार्यक्रम जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुकास्तरावरील स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त अशा एकूण १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे हे होते.
उद्घाटन राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी निलेश सोमाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, भगवान ढोले, विनोद पट्टेबहाद्दूर, रुपेश बाजड, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक वासुदेव ढोणे, धानोरकर विद्यालयाचे प्रा. यु. एस. बावनकर, व्ही. पी. गावंडे उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शुभांगी दामले, रामराव झनक महाविद्यालयाच्या डॉ. लता जावळे, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विष्णू लांडे यांनी काम पहिले. स्पर्धेमध्ये धानोरा खुर्द येथील धानोरकर आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाची साक्षी संतोष पाटील हिने प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह बक्षीस पटकाविले. वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी पार्वती राजे हिने द्वितीय क्रमांकाचे ७ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह हे बक्षीस तर मोठेगाव (ता. रिसोड) येथील रामेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालायची विद्यार्थिनी शिवानी संतोष जाधव हिने तृतीय क्रमांकाचे ५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह हे बक्षिस पटकाविले. मुंबई येथील विधान मंडळमध्ये ३० व ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी या तिन्ही विजेत्यांची निवड झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनसिंग येथील प. दि. जैन विद्यालायचे जितेंद्र खंगार यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद काटोलकर, संतोष कनकावर, भारत वैद्य, कलीम मिर्झा, सुरज भड, शुभम कंकाळ यांनी परिश्रम घेतले.





