लाखांदूर,दि.4 : स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी यापूर्वी सरकारमध्ये असताना आम्ही केली होती. तत्कालीन सरकारने देशातील दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आमिष दिले होते. गोरगरीब जनतेला २०१९ पर्यंत घरकुल योजनेचा लाभ देऊन आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतेही काम शासनाकडून झाले नसल्याने दिशाभूल करणाऱ्या शासनाचे गुलाम बनू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी केले. पिंपळगाव को. येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित बौद्धविहार समाजमंदिर व अभ्यासिका वर्गाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते..
जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे म्हणाले, अनेक महापुरुषांनी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी सतत परिश्रम घेतल्याचे आपण सर्वांनी वाचले असावे. माणूस कर्मानेे मोठा होतो बोलण्याने नाही. मागील दोन वर्षापूर्वी अध्यक्षपद सांभाळताना शासनाच्या भेदभावाला संबंध जिल्हा सामोरे जात असल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. मात्र गोरगरीब जनतेच्या हितासाठी आम्ही शासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करूनही या जिल्ह्याला विकासकामात अद्याप न्याय मिळाला नाही. नाना पटोले यांच्या नेतृत्वात या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही समर्पित वृत्ती धारण केली असताना जनतेने देखील कर्तबगारांच्या पाठीशी राहणे गरजेचे असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज बंसोड यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन बबन गजभिये यांनी केले. यावेळी गावातील बहुसंख्य महिला-पुरुष उपस्थित होते..





