अर्जुनी मोर.(संतोष रोकडे),दि.04ः- पुर्व विदर्भातील शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोर तालुक्यातील इटियाडोह धरण हे सिंचन व मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. धरणात विविध प्रजातीच्या मासोळ्या असल्या तरी तेलापी प्रजातीच्या मासोळीचे उत्पादन याठिकाणी विशेषत्वाने घेतले जाते.सोबतच झिंग्याचेही उत्पादन घेतले जाते. तेलापी मासोळीच्या निर्मितीसाठी इटियाडोह धरणाच्या पाण्यात केज कल्चर प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. 
उंच पहाड व निसर्गाच्या कुशीत बांधलेला इटियाडोह धरण अर्जुनी मोर तालुक्याचा भुषण म्हणून ओळखला जातो. सन 1965 मधे माती व दगडी भरावाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. या धरणातील पाण्याचा भंडारा गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होतो.तसेच मासेमारीसाठी सुध्दा हे धरण प्रसिद्ध आहे. या धरणात ” इटियाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था रामनगरच्या माध्यमातून केज कल्चर प्रोजेक्ट धरणाच्या पाण्यात विशीष्ठ साहित्याचे माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून पिंजरा पध्दतीने मत्स्य उद्योग केल्या जाते.या प्रकल्पात बिज उत्पादन तयार करुन तेलापी प्रजातीची मासोळी उत्पादीत करुन विक्री केली जाते. तेलापी मासोळीची वाढ मोठी होत नसली तरी अर्धा ते दिडकिलो वजनापर्यंत वाढ होते. खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असल्याने या मासोळीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
याच धरणात बाहेरून बिज आणुन व त्यावर प्रक्रिया करुन झिंग्याचे उत्पादन सुध्दा घेतले जाते. उत्पादीत केलेला झिंगा 250 ते 300 ग्राम वजनाचा होतो.येथील झिंगा सुध्दा चविष्ट असल्याने याचीही मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. या सोबत धरणात विविध प्रजातीचे मासेसुध्दा उपलब्ध होत असुन विदर्भात या धरणातील मासोळी व झिंग्याना मोठी मागणी असते.




