भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसला संमिश्र यश

0
14

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले असताना बुधवारी (दि.२२) गोंदिया तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपला संमिश्र यश मिळाल्याचे गुरूवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरून दिसले. मात्र काही ठिकाणी काँग्रेस सर्मथक गटाचे पूर्वी असलेले वर्चस्व कमी होऊन त्यांना नुकसानीचा सामना करावा लागला.
गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, फुलचूरटोला, चुटिया, घिवारी, कटंगटोला, नागरा व हिवरा या आठ ग्रामपंचायतींसोबत ढाकणी, मुंडीपार (ढा.), किन्ही आणि देवूटोला या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक झाली. तसेच गोरेगाव तालुक्यातील कमरगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा, बाकटी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी (ख.) येथे ग्रामपंचायत प्रभागाची पोटनिवडणूक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभरात झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा प्रभाव राहील असे वाटत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी बाजी मारली.
गोंदिया तालुक्यातील ८ सार्वत्रिक आणि ४ पोटनिवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या तहसील कार्यालयाखालील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी १0 वाजतापासून सुरू झाली. इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशिनने मतदान झाले असल्याने काही १२.३0 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. यासोबतच सडक अर्जुनी, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोटनिवडणुकीसाठी तेथील तहसील कार्यालयात शांततेत मतमोजणी झाली.
जसजसे निकाल जाहीर होत होते तसतसे उमेदवारांच्या सर्मथकांकडून गुलाल उधळल्या जात होता. अंतिम निकालानंतर विजयी पॅनलमधील उमेदवारांनी ढोलताळे लावून विजयी मिरवणुका काढल्या.