* 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्व मंडळातील पिकांचे पंचनामे
* अतिवृष्टी झालेल्या मंडळासह सर्वच मंडळात होणार पंचनामे.
वाशिम, दि.01 : जिल्ह्यात अवेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांसह सर्वच महसूल मंडळात हे पंचनामे होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता संपणाऱ्या 24 तासांत एकाच दिवशी वाशिम तालुक्यात 49.03 मि.मी., मालेगाव तालुक्यात 39.13 मि. मी., रिसोड तालुक्यात 25.88 मि. मी., मंगरुळपीर तालुक्यात 31.00 मि. मी., मानोरा तालुक्यात 21.75 मि. मी. आणि कारंजा तालुक्यात 24.25 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनी तालुका समन्वयक, ज्या बँकेत विमा हप्ता भरला त्या बँकेत अर्ज करून माहिती देण्याबाबत यापूर्वीच कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 2 लाख 95 हजार 290 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यामुळे 2 लाख 4 हजार 100 हेक्टर क्षेत्राला विमा कवच मिळाले आहे.
जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील अवेळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे 33 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही, अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही केले जाणार आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी पंचनाम्यास सुरुवात केली आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




