गोंदिया,दि.07ः-जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेतकर्यांचा पिकांचे नुकसान व धान खरेदी केंद्राबाबत निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ ५ नोव्हेंबर रोजी गेले असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी वेळ न देता कक्षाबाहेर जाण्यास सांगून वाट बघण्याचे सांगितले. जिल्हाधिकार्यांची वर्तवणूक ही शिवसैनिकांसोबत अपमानास्पद होती. याचा आम्ही निषेध करीत असून आयुक्तांना याबाबत तक्रार करणार असल्याचे शिवसेना जिल्हा समन्वयक नगरसेवक पंकज यादव यांनी सांगितले.
ते यादव चौक येथील त्यांच्या कार्यालयात ५ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तेजराम मोरघडे, जिल्हा संघटक सुनिल लांजेवार, सचिव अमरसिंह राजपुत, अशोक अरखेल, सोनू चंद्रवंशी आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना यादव म्हणाले की, दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. तर सालेकसा येथील महिला कार्यकर्त्या दुपारी १२ वाजतापासून भेटण्यासाठी बसल्या होत्या. जिल्हाधिकार्यांची सामान्य जनतेला भेटण्याची वेळ ३ ते ४ वाजेपर्यंत आहे. आम्ही पोहोचल्यावर याची माहिती त्यांच्या सचिवांना दिली होती. मात्र, त्यावेळी खासदार साहेबांच्या बैठकीत जिल्हाधिकारी व्यस्त होत्या.
या दरम्यान दुपारी ३.४५ ला आमदार सहषराम कोरोटे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले असता त्यांना सरळ जिल्हाधिकार्यांचा कक्षात प्रवेश देण्यात आला. ४.१५ वाजता जिल्हाधिकारी मिटींग हॉल मधून आपल्या कक्षात आल्या व त्यांच्या मागोमाग आम्ही सुद्धा शिष्टमंडळासह कक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाधिकार्यांनी आमच्यासोबत अपमानास्पद वागणूक देवून, मला आधी खासदार व आमदार यांच्याशी चर्चा करायची आहे, आपण बाहेर वाट बघावी असे सांगितले व निवेदन स्विकारले नाही. हा आमचा अपमान आहे, आम्ही या वर्तवणुकीचा निषेध करतो व या संदर्भात आयुक्तांना जिल्हाधिकार्यांची तक्रार करणार असल्याचे सांगितले. आमच्यासोबत असा व्यवहार होत असेल तर सामान्य जनतेसोबत कसे होत असेल असा प्रश्नही यादव यांनी उपस्थित केला.





