साकोली,दि.07ः-भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत देण्यात यावी या प्रमुख मागणीसह वाढती महागाई व बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी ११ वाजता साकोली येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
२४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी शेतात कापून ठेवलेल्या कडपा पाण्यात भिजून त्यातून कोंब निघाले आहेत. त्यातून दुर्गंधी सुटली आहे. तरीसुद्धा धान पिकाचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहे.
भाजप सरकारच्या धोरणामुळे देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खालावत असून नवीन रोजगार निर्मीती पूर्णपणे ठप्प असल्याने बेरोजगारी वाढत आहे. याशिवाय महागाई गगनाला भिडली आहे. या सर्व बाबींचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे शेतकर्यांना धीर देण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
या आंदोलनाला आ. नाना पटोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे,आदींनी संबोधित केले. दुपारी ३ वाजतापर्यंत ठिय्या आंदोलन केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविण्यात आले. पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना सरसकट मिळाली पािहजे. सर्व शेतकर्यांची सरसकट पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. बेरोजगारी, महागाईचे संकट दूर करण्यात यावे, कृषीपंपाचे भारनियमन बंद करुन २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, मोदी सरकारने देशातील सोने कोणत्या कामासाठी गहाण ठेवले याची माहिती जनतेला देण्यात यावी, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प. सभापती रेखा वासनिक, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, मंदा गणवीर, सुनिता कापगते ,आरपीयआचे राजकुमार भेलावे,गोंदियाचे विरेंद्र जायस्वाल ,राजीव ठकरेले,दामोदर नेवारे,सदाशिव वलथरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





