होमिओपॅथी डॉक्टरांच्या अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीसला विरोध

0
12

नागपूर: मी होमिओपॅथीचा कट्टर समर्थक आहे. पण होमिओपॅथी डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याला माझा विरोध आहे. या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीच्या मागे न लागता होमिओपॅथीलाच अधिक भक्कम करण्यासाठी संशोधनावर भर द्यावा,असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

होमिओपॅथी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन आॅफ इंडियातर्फे (हीम्पाम) येथील हिंदी मोर भवनमध्ये होमिओपॅथिक चिकित्सकांचा विदर्भस्तरीय मेळावा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात ते ते बोलत होते. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दादासाहेब कविश्वर, डॉ. बाहुबली शहा, डॉ. अरुणकुमार भस्मे, हिम्पासचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश झामड डॉ. शांतीलाल देसरडा, डॉ. डी.बी.चौधरी, डॉ. रवींद्र भोसले, डॉ. शिवदास भोसले, डॉ. कांचन देसरडा, डॉ. रवींद्र पारख उपस्थित होते.
यावेळी ‘फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमासंदर्भात शासकीय, विद्यापीठस्तरावर कार्यवाही’, ‘भारताच्या आरोग्य सेवेच्या भवितव्यासाठी सर्वसमावेशक चिकित्सा पदधतीत व वैद्यकीय सेवा आणि शिक्षण यात सुधारण्याची गरज’ या विषयावर चर्चासत्र झाले.
सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावरील सर्वच वक्त्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याचे समर्थन केले आणि याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. हाच मुद्दा मेळाव्याच्या केंद्रस्थानी होता. मात्र कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सभागृहात आलेल्या गडकरी यांनी या मुद्याला विरोध दर्शविला. ते म्हणाले की, मी स्वत: होमिओपॅथीचा कट्टर समर्थक आहे. औषधही होमिओपॅथीचेच घेतो. पण या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास माझा विरोध आहे. डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीच्या मागे लागणे म्हणजे होमिओपॅथीवरच अविश्वास दाखविण्यासारखे आहे. ज्यांच्या आपल्या पॅथीवरच विश्वास नाही ते चांगली प्रॅक्टीस करू शकत नाही. होमिओपॅथीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची शक्ती आहे हे वेळोवेळी सिद्ध सुद्धा झाले आहे. त्यामुळे या पॅथीवर विश्वास ठेवून अ‍ॅलोपॅथीच्या मागे धावू नका.
होमिओपॅथीमध्ये संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून संशोधन केल्यास रुग्णांना आणि या क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल. त्यादृष्टीने डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असे गडकरी म्हणाले.
राज्यात या पॅथीची ४८ महाविद्यालये असून ती खासगी आहेत. सरकारी कॉलेज असावे अशी मागणी आहे. यालाही माझा विरोध आहे. सरकारी महाविद्यालयांची अवस्था कशी होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या पॅथीच्या विकासासाठी आणखी खासगी महाविद्यालये सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान नागपूरमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरू करावे, एम्समध्ये होमिओपॅथीसाठी ओपीडी सुरू करा आणि नॅशनल होमिओपॅथी संशोधन केंद्र नागपूरमध्ये सुरू करा, आदी मागण्या करण्यात आल्या व त्याचे निवेदन गडकरी यांना देण्यात आले. यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुभाष राऊत, डॉ. राजेश रथकंटीवार आणि डॉ. मनीष पाटील यांनी केले.