26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ कोंढा-कोसरा येथे शिवसेनेचा रास्ता रोको

कोंढा-कोसरा येथे शिवसेनेचा रास्ता रोको

0
51

पवनी,दि.22ः- भंडारा-पवनी रस्ता चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून कासवगतीने सुरू असून दोन महिन्यापासून कंत्राटदार बेपत्ता झाल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच अपघातात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. यासंदर्भात भंडार्‍याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात कोंढा- कोसरा राज्यमार्गावर गरुवारी (दि.२१) दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
कोसरा ग्रामपंचायतीसमोरील राज्य मार्गावरील आयोजित आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख विजय काटेखाये, अनिल गायधने, सहकार जिल्हा प्रमुख राजेंद्र ब्राम्हणकर, अनिल धकाते, नरेश ब्राम्हणकर, प्रशांत भूते, सुधाकर साठवणे, प्रकाश मानापूरे, शिवा फंदी, भाग्यश्री गभने, सरपंच शेवंता जुगनायीके, जितू लिचडे, ज्ञानेश्‍वर कुझ्रेकर, नाना उपरीकर, संतोष वंजारी, मधू मोहरकर, विजय देशमुख, प्रशांत काजळखने, राहुल वागळे आदी शिवसैनिक व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस निरीक्षक सुरेश ढोबळे व त्यांच्या सहकार्‍यांनी वाहतूक सुरळीत केली. यावेळी प्रशासनाकडून पवनीचे नायब तहसीलदार चौधरी आंदोलनस्थळी उपस्थित झाले. मार्गावरील खड्डे तत्काळ डागडुजी करून रस्त्यावरील धुळीचे निवारण करणे, कंत्राटदाराने बंद केलेले काम तत्काळ सुरू करण्यास व सदर मार्गावरील झालेल्या अपघातातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार भोंडेकर यांनी तहसीलदारांना केली.
सदर मागण्या निकाली न निघाल्यास ५ डिसेंबरला तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने करणार असल्याचे आ. भोंडेकर यांनी तहसीलदारांना सांगितले.

blank