24.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ मोबाईल व टॅबलेटच्या माध्यमातून सातवी आर्थिक जनगणना उद्यापासून होणार

मोबाईल व टॅबलेटच्या माध्यमातून सातवी आर्थिक जनगणना उद्यापासून होणार

0
63

गोंदिया,दि.२५ः- भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने उद्या २६ नोव्हेबंरपासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेट अ‍ॅपचा वापर करून करण्यात येणार असल्याने नागरिकांनी यात सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांनी पत्रपरिषदेतून केले आहे.
डॉ.बलकवडे यांनी सांगितले की, सातवी आर्थिक जनगणना आपल्या मोबाईल, टॅबलेटच्या माध्यमातून सुरू होत असून यामध्ये ब्लॉकमधील सर्व घरे, दुकाने आणि लहान मोठे दुकानदार जोडले जाणार आहे. हे संपूर्ण कार्य पेपरलेस राहणार आहे. तसेच सदर योजना राबविण्यासाठी केंद्रसरकारने सीएससी या संस्थेची निवड केली आहे.या संस्थेने यासाठी ८९६ प्रगणक व ५६५ पर्यवेक्षकाची निवड केली असून हे गावागावात जाऊन नोंदणी करणार आहेत.येत्या तीन महिन्यात ही आर्थिक गणना जिल्ह्यात पुर्ण करावयाची असून या केलेल्या गणनेची ८ टक्के तपासणी जिल्हा सांख्किंकी विभाग करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.यात कुठल्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.यामध्ये सीएससी केंद्रचालक सुपरवायझर म्हणून काम पाहणार आहे. तसेच सव्र्हेअर सर्वेक्षण करणार आहे. सुपरवायझर आणि सव्र्हेअर यांना ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अशी माहिती आयोजित कार्यशाळेत देण्यात आली. आर्थिक जनगणना कशी करावयाची याबाबतची माहिती उपस्थित व्हीएलई यांना देण्यात आली.
पेपरलेस काम पहिल्यांदाच होणार
यापूर्वी सहा आर्थिक जनगणनेचे काम पेपरवर करण्यात आले होते. सव्र्हेअर यासंदर्भातील माहिती फिल्डवर फिरून गोळा करून ती सादर करीत असे त्या आधारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अशी माहिती संकलित होत होती. यावेळी या संपूर्ण जनगणनेचे काम पेपरलेस होणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे राज्याच्या बहुतांश भागात सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे सुरु असलेल्या उद्योगाची माहिती गोळा करून डाटा तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी शेतावरील काम सोडून सर्वच गृहउद्योगापासून तर व्यवसायिक उद्योगाची नोंद करण्यात येणार आहे.पत्रपरिषदेला जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले,जिल्हा सांख्किकी अधिकारी सुनिल फुके,संदिप भायदे,तुळशीराम झंझाड सीएसएसीचे मयुर टप्पे,कुणाल गणवीर उपस्थित होते.