26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ पुरस्कारासाठी नव्हे तर गाव शाश्वत ठेवण्याचा दृष्टीने स्पर्धा राबवा

पुरस्कारासाठी नव्हे तर गाव शाश्वत ठेवण्याचा दृष्टीने स्पर्धा राबवा

0
37

सडक अर्जुनी येथे तालुकास्तरीय स्वच्छता मेळावा

उत्कृष्ट प्रभागातील सदस्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन केला सत्कार

सडक अर्जुनी,दि.०१ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत प्रत्येक गावांत स्वच्छता स्पर्धा राबविण्यात येत आहे, मात्र ही स्पर्धा फक्त पुरस्कारांसाठी न राहता गावातील शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी ठेवावी असे आवाहन उपस्थित अतिथींनी उपस्थित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना केले.
पाणी व स्वच्छता विभाग गोंदिया व पंचायत समिती सडक अर्जुनीच्या वतीने तालुकास्तरीय स्वच्छता मेळाव्याचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गिरीधर हत्तीमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरी ताई पाथोडे, जिल्हा परिषद सदस्य शीलाताई चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती राजेश कठाने, पंचायत समिती सदस्य विलास शिवणकर, पंचायत समिती सदस्य मंजुषा डोंगरवार, गटविकास अधिकारी श्री निर्वाण, बालविकास प्रकल्प अधिकारी मेंढे, जिल्हा परिषद गोंदियाचे शालेय स्वच्छता सल्लागार रहांगडाले आदी उपस्थित होते. यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार तपासणी विषयी सविस्तर मार्गदर्शन जिल्हा परिषद गोंदियाचे शालेय स्वच्छता सल्लागार भागचंद्र रहांगडाले केले. यावेळी पंचायत समिती सभापती गिरीधर हत्तीमारे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी ताई पाथोडे, गटविकास अधिकारी निर्वाण, पंचायत समिती उपसभापती राजेश कठाने, पंचायत समिती सदस्य शिवणकर, विस्तार अधिकारी पंचायत खुणे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामपंचायतींनी केवळ पुरस्कारासाठी स्पर्धा न राबविता गावांत शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी उगले यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी आरोग्य श्री लोकेश कटरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसमन्वयक . राधेश्याम राऊत, समूह समन्वयक साखरे यांनी अथक परिश्रम घेतले.