गुलाबी थंडीत रंगले अस्सल मराठीतील कवी संमेलन

0
44

गोंदिया,दि.31 : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व श्री गणेश ग्रामीण शिक्षण विकाससंस्था वीर राजे चिमणा बहादुर फाउंडेशन या द्वारा आयोजित दोन दिवसीय २७ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून विविध जिल्ह्यातून आलेल्या कवी / कवयित्रींनी भर गुलाबी थंडीत दर्जेदार कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तसेच शेतकरी व्यथा, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, प्रेम, राजकीय घडामोडी, प्रेम, विरह, अश्या विविध सामाजिक समस्यांवर कवितांच्या माध्यमातून कवींनी प्रहार केला असून संमेलन याप्रसंगी अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक हिरामण लांजे यांनी दैना गावाची पाहून या कवितेत “दूर झाडी मंदि माजा,लहानसा गाव चालं दंडार, नाटक त्याचा दूरवर नाव” अस्सल ग्रामीण जीवन रेखाटून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर अशा कित्येक दर्जेदार कवितांनी कविसंमेलनात रंगत आली असून तरूणाईच्या मनातील खरी क्रांती चेतनवणारी कविता लोकेश नागरीकर यांनी सादर केली असून “क्रांतीच्या नावावर ही पाठ फिरविली जाते, तेव्हा मला खंत वाटते” माणसातील माणूसपण हरवत चाललेले असून ते खऱ्या अर्थाने जागे व्हावे या हेतूने कवी देवेंद्र रहांगडाले यांनी आपल्या संपू दे अंधार सारा या कवितेत “संपू दे अंधार सारा उजेड व्हावा धरतीवर माणुसकीची ध्वजा दिसावी हैवानाच्या प्रेतावर” असा अमाणूस जगणा-यांवर कवितेतून प्रहार केला. देशातील संविधानाविषयीची वर्तमानातील परिस्थिती पाहता भारावलेल्या कविमनाचा कवी दिनेशकुमार अंबादे यांनी आर्त भाव व्यक्त करताना सविधान हे जळत आहे या कवितेत “संविधान हे जळत आहे आम्ही डोळ्यांनी पाहिलं रं, कर्तव्यावर सोडून पाणी हक्कासाठी जे ते भांडती रं” अशी दु:खद भावना व्यक्त केली. एवढ्यावरच कवि थांबले नाहीतर तरुणाईचा प्रेमगंध रेखाटणारी “पापणीला पापणी लागली तरी झोप काही केल्या येत नाही मी आठवून आठवून थकून जातो पण तुझ्या आठवणी मात्र सरत नाही” अशी कविता प्रा. अश्विन खांडेकर यांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्रातून आलेले कवी ही एकाच विषयावर कविता सादर न करता वर्तमानातील बेरोजगारीची परिस्थिती पाहून भारावलेले कविमन त्यावरही प्रहार करू लागले त्यातील आशिष अंबुले यांनी ” खांदे आहेत खाली कोणाचा तरी बोजा पाहिजे बेरोजगार आहो साहेब मले रोजगार पाहिजे” अशी शेतकरी सुशिक्षित बेरोजगार लेकराची व्यथा मांडली आहे.
त्याचबरोबर कविसंमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, नुरजहा पठाण, नरेश देशमुख, डोमाजी कापगते, यशवंत तागडे हे उपस्थित होते. तर सहभागी कवी म्हणून चंद्रकुमार बहेकार, इंद्रकला बोपचे, पवन पाथोडे, वंदना कटरे, किशोर चौधरी, विनोद गव्हाणे, देवेंद्र चौधरी, विजय मेश्राम, चिरंजीव बिसेन, दिवाकर मोरस्कर, दौलत खान पठाण, चैतन्य माटूलकर, उषा गजभिये यांनी विशेष सहभाग नोंदविला असून कार्यक्रमाचे संचालन लोकेश नागरीकर यांनी केले तर सहभागीकवींचे आभार राजेश हजारे यांनी मानले.