विदर्भातील सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित

0
63

गोंदिया,दि.31 : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारी झालेल्या  मंत्रीमंडळ विस्तारात विदर्भातील अकरा पैकी पाचच जिल्ह्य़ांना प्रतिनिधित्व मिळाले.तर पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा हे चार आणि पश्चिम विदर्भातील वाशीम आणि अकोला हे दोन असे एकूण सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत.उपराजधानीला मात्र तीन मंत्रीपद दिले गेले तर भंडारा जिल्ह्याला विधानसभा अध्यक्षपद मिळाल्याने त्या जिल्ह्यालाही सरकारने आपल्या मोजणीत घेतले असले तरी गोंदिया,गडचिरोली व वर्धा जिल्ह्यासोबत नेहमीच मंत्रीमंडळ विस्तारात दुजाभाव होत राहिल्याचे आजवरचे चित्र राहिले आहे.युती सरकारच्या काळात महादेवराव शिवणकर यांच्यानंतर भाजप सरकारच्या काळात राजकुमार बडोले हेच गोंदिया जिल्ह्यातील मंत्री झालेत अन्यथा या जिल्ह्याला कधीच संधी मिळाली नाही.
भाजपच्या फडणवीस सरकारमध्ये विदर्भातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह ९ होती व त्यात बुलढाणा, वर्धा, भंडारा आणि वाशीम या चार जिल्ह्य़ांना मंत्रिपदे नव्हती. हे येथे उल्लेखनीय. ठाकरे सरकारमध्ये यापेक्षा एक मंत्री कमी आहे. हे येथे उल्लेखनीय.
विदर्भातील एकूण ६२ जागांपैकी सत्ताधारी महाविकास आघाडीकडे एकूण २५ जागा (काँग्रेस १५, राष्ट्रवादी ६ आणि सेना ४) आहेत. यापैकी मंत्री झालेल्या आठ जणांमध्ये सर्वाधिक चार मंत्री काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे, एक शिवसेना आणि एक अपक्ष आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नितीन राऊत, सुनील केदार (नागपूर जिल्हा), यशोमती ठाकूर (अमरावती जिल्हा) आणि विजय वडेट्टीवार (चंद्रपूर जिल्हा), राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये राजेंद्र शिंगणे (बुलढाणा जिल्हा), अनिल देशमुख (नागपूर जिल्हा), शिवसेनेकडून संजय राठोड (यवतमाळ जिल्हा) यांचा समावेश आहे. सेनेने त्यांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (अमरावती जिल्हा) यांना संधी दिली आहे.
विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांपैकी नागपूर जिल्ह्य़ाला तीन, अमरावती जिल्ह्य़ाकडे दोन आणि यवतमाळ, चंद्रपूर आणि बुलढाणा या जिल्ह्य़ांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळाले आहे. वाशीम, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत.
शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षात मंत्रिपदाचे वाटप करताना विभागीय समतोल राखणे तसेच त्या-त्या भागातील प्रमुख नेत्यांना संधी देण्याचे आवाहन वरील तीनही पक्षांच्या प्रमुखांपुढे होते. मात्र हे करताना काही जिल्ह्य़ांवर अन्याय झाल्याचे दिसून येते.नागपूर जिल्ह्य़ात काँग्रेसने दोघांना संधी दिली आहे व राष्ट्रवादीने पूर्व विदर्भाला संधी देताना नागपूरचीच निवड केल्याने या जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला तीन मंत्री आले. अमरावती जिल्ह्य़ात सेनेने बच्चू कडूंना तर काँग्रेसने पश्चिम विदर्भाला प्रतिनिधित्व देताना यशोमती ठाकूर यांची निवड केली. त्यामुळे या जिल्ह्य़ात दोन मंत्रिपदे गेली.
पालकमंत्री कोण होणार
नागपूर जिल्ह्य़ातून तीन मंत्री असल्याने पालकमंत्र्यांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. अनुभवी मंत्री म्हणून नितीन राऊत यांचे नाव यासाठी अग्रस्थानी आहे. त्यांनी यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारकच्या काळात हे पद भूषवले आहे. मात्र देशमुख आणि केदार या पदासाठी इच्छुक आहेत. केदार यांना भंडारा किंवा वर्धा तर अनिल देशमुख हे गडचिरोली किंवा गोंदियाचे पालकमंत्री,यशोमती ठाकूर यांना अमरावती ,संजय राठोड यवतमाळ,बच्चू कडू यांना वाशिम,विजय वड्डेटीवारांना चंद्रपूर व गडचिरोली अशाप्रकारे पालकमंत्री वाटप होण्याचा कयास लावला जात आहे.