28.9 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ ओबीसींची जातीनिहाय जनगणनेसाठी भंडाऱ्यात ओबीसींचा हुंकार

ओबीसींची जातीनिहाय जनगणनेसाठी भंडाऱ्यात ओबीसींचा हुंकार

0
28

भंडारा,दि.05ः- स्वतंत्र भारतात सन १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खुंटली आहे. तेव्हा २0२१ मध्ये होणार्‍या जनगणनेत एससी, एसटीप्रमाणे ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली जावी व जनगणना प्रपत्रात ओबीसींचा स्वतंत्र रखाना तयार करण्यात यावा, या मागणीसाठी ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने ओबीसींचा विशाल मोर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात भंडारा जिल्ह्यातील हजारो ओबीसी महिला पुरुष सहभागी झाले होते.जिल्ह्यात पहिल्यांदाच आपल्या संविधानिक हक्कासाठी ओबीसी रस्त्यावर उतरला होता.दसरा मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात धडकला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
ओबीसी समाजासाठी कालेलकर आयोग, मंडल आयोग, स्वामीनाथन आयोग, नचिअप्पन समिती आदी आयोग स्थापन करून अंमलबजावणी न करता आजपर्यंत ओबीसींवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे ओबीसीत मोडणार्‍या लोकांना शिक्षण, नोकरी, शेती व्यवसायातील सवलती, लघु उद्योगातील सवलती, शासकीय व खासगी नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. ५२ टक्के ओबीसींना त्यांचे अधिकार न देता तो अज्ञानात व कर्जात जन्मावा व त्यातच जगावा अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. ओबीसींची जनगणना न झाल्याने त्यांची अधिकृत संख्या माहित नाही, अशी कारणे देत ओबीसींचे आरक्षण महाराष्ट्रात १९ टक्के व केंद्रात २७ टक्के दिले असून, त्यातही क्रिमिलिअरची असंवैधानिक अट घातलेली आहे. त्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, त्याकरीता जनगणना प्रपत्रात ओबीसींचा स्वतंत्र रखाना जनगणनेसाठी तयार करण्यात यावा, संविधानाच्या ३४0 व्या कलमाची अंमलबजावणी करण्यात यावी, एससी, एसटीप्रमाणे ओबीसींना शासकीय सर्व योजनांचे लाभ देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, क्रि मीलेअरची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना १00 टक्के शिष्यवृत्ती मिळावी, ओबीसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी जातीनिहाय यादीत समावेश करण्यात यावा, या मागण्यांसाठी ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने विशाल मोर्चा काढत सरकारला आता ओबीसी जागृत झाल्याचे दाखवून दिले.विशेष म्हणजे या मोर्च्याला सर्वपक्षीय नेत्यांसह आजी माजी खासदारांनी हजेरी लावत शेवटपर्यंत ओबीसी कार्यकर्ते म्हणून उपस्थित राहिले.परंतु काही नेते छायाचित्र काढण्यासाठी थोडावेळ रॅलीत चालल्यानंतर निघून गेले.blank
दसरा मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात धडकला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मुख्य समन्वयक सदानंद इलमे, प्रा.जयंत झोडे, ज्ञानेश्‍वर दमाहे, अनंतलाल दमाहे, बाळकृष्ण सार्वे,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,अड.अंजली साळवे,ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. प्रदिप ढोबळे यांची भाषणे झाली. या मोर्चात खासदार सुनिल मेंढे,विधानपरिषदेचे आमदार डाॅ.परिणय फुके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी खासदार मधुकर कुकडे,शिशुपाल पटले,भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर,तुमसरचे आमदार राजू कारेमोरे,तुमसरचे नगराध्यक्ष प्रदिप पडोळे, माजी आमदार सेवक वाघाये,रामलाल चौधरी,किसान गर्जनेचे इंजि.राजेंद्र पटले, पांडुरंग फुंडे, मुरलीधर भर्रे, संजय आजबले,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी लांबट,जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर,ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, के. झेड. शेंडे,छावा संग्राम परिषदेचे सुभाष आजबले,ओबीसी सेवा संघाचे संघटन सचिव सावन कटरे,जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती धनेंद्र तुरकर, मनोज शरणागत,विनायक येडेवार,उमेश सिंगनजुडे, आनंदराव उरकुडे, गोपाल ठवकर, जयंता झोडे, विश्‍वजीत पुंडे, गोपाल देशमुख, रामलाल बोंद्रे, ईश्‍वर निकुडे, मनोज बोरकर, डॉ. विनोद भोयर, डॉ. महेंद्र गणवीर, डॉ. प्रताप गोंदुळे, रोशन काटेखाये,मंगेश वंजारी,रोशनीताई पडोले,अंजली बांते,वनिता कुथे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. संचालन संजय आजबले, उमेश मोहतूरे यांनी तर आभार भगीरथ धोटे यांनी मानले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

केंद्रातील स्वपक्षाच्या विरोधात निघालेल्या मोर्च्यात खा.मेंढेसह भाजप नेत्यांची ओबीसी म्हणून हजेरी

blankस्वातंत्र्यानंतर 72 वर्ष लोटूनही कुठल्याच सरकारने ओबीसींची जनगणना केली नाही.त्यातच 2014 पासून सत्तेत असलेल्या केंद्रातील भाजप सरकारचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ओबीसींची जनगणना आमची सरकार करेल अशी घोषणा केली होती.त्यानंतर 2019 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपपक्षाच्या सरकारनेच मात्र 2021 मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेच्या प्रपत्रात ओबीसींच्या जनगणनेसाठी स्वतंत्र उल्लेख न करता फसवणूक केल्याने देशव्यापी आंदोलन सुरु आहे.त्या आंदोलनांतर्गतच भंडारा येथे ओबीसींचा जातीनिहाय जनगणेसाठी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.या विराट निघालेल्या मोर्च्यात आपण आधी ओबीसी नंतर पक्षाचे नेते हे ब्रीद स्विकारत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुनिल मेंढे,विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके,माजी खासदार शिशुपाल पटले,भाजप जिल्हाध्यक्ष इंजि.प्रदिप पडोळे,डॉ.विजया नंदूरकर यांच्यासह आदींनी हजेरी लावली.या मोर्च्यात सहभागी होत काही अंतरापर्यंत मोर्च्यासोबत आलेले हे लोकप्रतिनिधी अखेरपर्यंत न थांबता मात्र मोर्चा अर्ध्यावर सोडून निघून गेले.मात्र आम्हीही ओबीसीचे हितचिंतक असल्याचे दाखविण्यासाठी मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी संसदेसह विधानसभेत मात्र जनगणनेसाठी आवाज उठविल्याचे कुठेच दिसून आले नाही.