गॅसच्या गळतीमुळे दुकानाला भीषण आग

0
5

देवरी दि. १3: टायर पंक्चरच्या दुकानात स्वयंपाक बनवीत असताना गॅसच्या गळतीमुळे दुकानाला भीषण आग लागली. त्यात सदर टायर पंक्चरचे दुकान पूर्णत: जळून राख झाले. दुकानातील लाखो रूपयांचे सामान-साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवार (दि.१२) सकाळी ८ वाजताच्या सुमारास देवरी येथे घडली.

राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला लागून असलेले रहमत टायर वर्क्स या दुकानातच अलाऊद्दीन जमुराती अंसारी व त्यांचा मुलगा शब्बीर अंसारी बऱ्याच वर्षांपासून राहत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता शब्बीरने स्वयंपाक बनविण्याकरिता स्टोव्ह पेटविला होता. मात्र बाजूला ठेवलेल्या सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याने सिलेंडर व टायरला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की दुकानातील सर्व लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले. सिलेंडर फाटल्यामुळे आग अधिकच भडकली होती.

दरम्यान दुकानातील साहित्य वाचविण्याच्या प्रयत्नात शेजारचा दुकानदार महेशकुमार अग्रवाल आगीत होरपळून जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली व आगीला आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. बाजूलाच लागून असलेल्या जय टायर्स येथील शेकडो टायर देवरीवासीयांच्या प्रयत्नामुळे वाचले. टँकरने पाणी बोलावून आग विझविण्यात आली.