पोलिसांच्या विरोधात आदिवासींचा एल्गार

0
8

एटापल्ली दि.१9: नक्षलवादी असल्याच्या खोट्या संशयावरून पोलिसांनी आदिवासी महिलेचा झडतीदरम्यान विनयभंग केला. तसेच तीन महिलांना असभ्य वागणूक दिली. पोलिसांच्या या चुकीच्या वर्तवणुकीच्या विरोधात सोमवारी हजारो आदिवासींचा मोर्चा एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकला.
उडेरा पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान पोलिसांनी आदिवासी महिलांशी केलेल्या असभ्य प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकरी नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्याकडे केली.
या मोर्चाचे नेतृत्त्व उडेरा गावातील गोंगलु गावडे, रूकमा तलांडे, मैनी पुंगाटी, महारू मडावी, रामा तुमरेटी, डी. पी. दहागावकर, सैनु गोटा, माधव मडावी, रामजी कत्तीवार, बैसू पुंगाटी, मोहन कुळमेथे यांनी केले.या मोर्चाची सुरूवात एटापल्ली येथील वन विभागाच्या नाक्यापासून झाली. मुख्य मार्गाने तहसील कार्यालयासमोरील आदिवासी मुलाच्या वसतिगृहात मोर्चा पोहोचला. त्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेदरम्यान उपविभागीय अधिकारी पाटील यांनी मोर्चेकर्‍यांशी चर्चा केली. या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील व उडेरा परिसरातील बहुसंख्य आदिवासी नागरिक सहभागी झाले होते.