२०० रुपयात हिस्से वाटणी, बक्षीसपत्राची अफवा

0
11

गोंदिया दि.२९–:महाराष्ट्र शासनाने रक्त नात्यातील काही व्यक्तींना बक्षीसपत्र किंवा हिस्सेवाटणी करण्यासाठी केवळ २०० रुपयांचे स्टॅम्प पेपर लागेल, अशी घोषणा केली असल्याचे काही लोकप्रतिनिधी जनतेला सांगून त्यांच्यांत भ्रम निर्माण करीत आहेत. मात्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे हे चुकीचे आहे. यासाठी मालमत्तेच्या किमतीवर दोन टक्के कर भरावाच लागणार आहे. त्यामुळे केवळ २०० रुपयांत हिस्सेवाटणी अथवा बक्षीसपत्र होते, अशी वल्गणा करणे म्हणजे म्हणजे जनतेची दिशाभूल करणारी आहे.

महाराष्ट्र शासनाने अनेक प्रकारच्या लोकोपयोगी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एका राजकीय पक्षाचे काही लोकप्रतिनिधी श्रम घेत आहेत. काही राजकारणी मंडळी योजनेची पूर्ण माहिती अवगत न करता अर्ध्या व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे लोकांना चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे काही लोकांना त्रास सुध्दा सहन करावा लागला. रक्त नात्यातील पती-पत्नी, मुलगा-मुलगी, नातु-नात, विधवा सुनेला मालमत्तेचे हस्तांतरण, बक्षिसपत्र वा हिस्सेवाटणी करतांना २०० रुपयांचे स्टॅम्प पेपर, एक टक्का जिल्हा परिषद कर, एक टक्का नोंदणी शुल्क भरावी लागणार आहे. यात भाऊ- बहीण, चुलत नाते संबंधातील व्यक्तींना सुट देण्यात आलेली नाही. ही सवलत केवळ निवासी आणि शेती मालमत्तेसाठीच आहे. व्यावसायिक मालमत्तांना पुर्वीसारखीच स्टॅम्पडयुटी भरावी लागेल. त्यामुळे सामान्य नागरीक व शेतकऱ्यांत नाराजी आहे.