बिंझवार आणि इंझवार वाद सोडवा – आ. विनोद अग्रवाल

0
83

गोंदिया दि.07 : : भारतात भाषावार प्रांतरचना झाल्यापासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश असे दोन राज्य विभागले गेले. ज्यात बिंझवार समाज हा सध्याच्या बालाघाट, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आदिवासी जमात म्हणून राहायचा. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश विभाजनानंतर मध्यप्रदेश राज्यात असलेला बिंझवार समाज हा महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या झाडीबोली भाषेच्या वापरामुळे अपभ्रंश होऊन इंझवार असे झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात निवासी असणाऱ्या बिंझवार समाजाला पुढे इंझवार असे संबोधले जाऊ लागले. कालांतराने इंझवार नाव हे नावारूपास येऊन प्रचलित झाले. त्यामुळे विविध दाखल्यावर सुद्धा बिंझवार ऐवजी इंझवार असे नाव नोंदविण्याची सुरुवात झाली.

मात्र इंझवार या शब्दाला फारसा असा इतिहास नसल्याने जुने दाखले देणे शक्य झाले नसल्याने त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळणे बंद झाले. ज्यामुळे मुळतः बिंझवार असलेल्या समाजाला विविध योजना आणि लाभापासून वंचित राहावे लागले. विशेष म्हणजे बिंझवार हे आदिवासी कुळातील जमात असल्याने आदिवासीनां मिळणारे विविध योजना आणि लाभापासून या समाजाला मागील कित्येक वर्षापासून वंचित रहावे लागले होते. या विषयावर आमदार विनोद अग्रवाल यांनी विधिमंडळात चर्चा घडवून आणली असल्याने मुळतः बिंझवार असलेल्या इंझवार समाजाला न्याय मिळणार असे चित्र दिसून येत आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात वास्तव्याला असणाऱ्या इंझवार समाजा विषयी प्रश्न निर्माण करून यावर तात्काळ एक समिती स्थापन करून चौकशी करण्यासाठी नेमणूक करावी अशी विनंती सभागृहात केली.

यातून हजारो इंझवार समाज बांधवांना आता आदिवासी म्हणून गणले जाऊ शकेल असे दिसून येत आहे. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील इंझवार समाजबांधवांमध्ये संतोष दिसून येत आहे व विविध माध्यमातून आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले जात आहे.