‘त्या’ कामचुकार आरोग्य सेवकावर कारवाईचा ठराव

0
8

बेरार टाईम्सने केले होते वृत्तप्रकाशित

गोंदिया दि.४: जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी जि.प.सभागृहात पार पडली. यावेळी आरोग्य विभागाकडून राबविल्या जाणार्‍या सावित्रीबाई फुले योजनेचे धनादेश व मुदत ठेवीचे प्रमाणपत्र गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित ठेवणारा आरोग्य सेवक लांजेवार याच्यावर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला.गेल्या सात वर्षापासून सावित्रीबाई फुले योजनेचे धनादेश न वाटप झाल्याने 2000 च्यावरील लाभार्थी वंचित असल्याचे वृत्त सर्वप्रथम साप्ताहिक बेरार टाईम्सने प्रकाशित केले होते.या वृत्ताचा आधार घेत सभापती मोरेश्वर कटरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करुन कारवाईची मागणी केली होती.ही स्थायी समितीची सभा आरोग्य आणि पंचायत विभागाच्या कारभारावरच गाजली.यावेळी जि.प.सदस्य राजेश चांदेवार,सभापती मोरेश्वर कटरे यांनी आरोग्य विभागाचा प्रश्न उपस्थित करून संबंधित आरोग्य सेवक लांजेवार यांच्या हलगर्जीपणामुळेच लाभार्थ्यांना सावित्रीबाई योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप केला. त्यावर जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची कानउघाडणी केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.हरिष कळमकर यांनी दोन दिवसात लांजेवार यांच्यावर कारवाई करुन याबाबतचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आणि संबंधितांना लाभ देणार असल्याचे सभागृहाला सांगितले.
आरोग्य व पशुसंवर्धन तसेच कृषी, पाणी पुरवठा या विभागांची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत आणि निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता कामांच्या ई-निविदा त्वरित प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सभेला सीईओ गावडे उपस्थित नव्हते. मात्र उपाध्यक्ष मदन पटले, सभापती सविता पुराम, मोरेश्‍वर कटरे, प्रकाश गहाणे, कुसन घासले व इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.