नागपूर,दि.25 : महिन्याच्या प्रारंभी ४ वर असलेली कोरोनाची रुग्ण संख्या अचानक शंभरी गाठल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. मात्र प्रशासनाने शहरातील संशयित रुग्ण एकही रुग्ण नसलेल्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे ठेवल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक आमदार समीर मेघे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्यांना विनंती केली. परंतु, प्रशासनाचा सूर बघता त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेवटी प्रशासनाने नमते घेत सर्व रुग्णांना हलविण्याचे आश्वासन दिले.
दिवसेंदिवस शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यातच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुर्यातून आजवर मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आले आहे. त्यामुळे या भागातील अनेक संशयितांना जिल्ह्यातील विविध विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रशासनाने सतरंजीपुरा येथील १२५ वर संशयितांना हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहात आणुन ठेवले. हे वस्तीगृह दाटीवाटीच्या परिसरात असून, सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. या संशयितांना येथे क्वारंटाईन केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत येथून इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच प्रशासनाने हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी या मोठ्या लोकवस्तीच्या व दाटीवाटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहात क्वारंटाईन केले. या भागामध्ये हिंगणा एमआयडीसी, औद्योगिक व कामगार क्षेत्र तसेच निलडोह, डिगडोह, इसासनी, रायपूर, हिंगणा असा मोठा भाग या वानाडोंगरी नगरपरिषदेशी संलग्न आहे. सदरचा भाग सध्या ग्रीन झोनमध्ये असून, तालुक्यात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. त्यातच महानगरपालिका प्रशासनाने सतरंजीपुरा या कोरोनाच्या रेड झोन भागातील संशयित नागरिकांना वानाडोंगरी येथे क्वारंटाईन केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या संशयितांना त्वरीत इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.मेघेंच्या ठिय्या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्यांनी वानाडोंगरी येथील संशयितांना त्वरीत नागपूरातील विलगीकरण केंद्रात हलविण्याची ग्वाही दिली. यानंतर मेघेंनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, सुचिता ठाकरे, बबनराव आव्हाळे, नारायण डाखळे, प्रवीण खाडे, पुरुषोत्तम डाखळे, आशिष पुंड, अनिल क्षिरसागर, जि.प. सभापती उज्ज्वला बोढारे, पौर्णिमा डाखळे आदी उपस्थित होते.





