26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात कोअर एरिया धोक्यात

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात कोअर एरिया धोक्यात

0
737

गोंदिया,दि.26 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन असताना नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात गत १०-१२ दिवसापासून वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे हे संबंधित वनक्षेत्राच्या बीटगार्ड्संना कोणतीही माहिती न देता कंत्राटदाराच्या माध्यमातून माती व मुरुम खोदकाम करीत असल्याचे दिसत आहे. मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष असल्याने अनेक प्रश्नांचा उधान आले आहे.
विशेष म्हणजे, या खोदकामातील जेसीबी व टॅक्टर व मानवी हस्तक्षेत्रामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांचे दर्शन दुर्लभ झाले असून नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया धोक्यात आला आहे. नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात गत १०-१२ दिवसापासून अवैध माती, मुरुम खोदकाम सुरु आहे. हे खोदकाम हिरापूर येथील एका कंत्राटदाराला हाताशी धरुन वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे यांच्याव्दारे कंपार्टमेंट क्र. १२६, ९७ व ९८ मध्ये करण्यात येत आहे. यासाठी ३ जेसीबी, अपेक ट्रॅक्टरचा वापर होत असून जेसीबीचे प्रती तास ९०० रुपये तर ट्रॅक्टर प्रती दिवस १५०० रुपये भाडे देण्यात येत आहे. तसेच डिझेलचा खर्च कंत्राटदाराला वनपरिक्षेत्राधिकार्‍यांकडून मिळत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात २२ बीट असून या बीटाची जबाबदारी बीटगार्ड्सवर आहे. तसेच १० विशेष बीटगार्ड आहेत. त्यांना या कामाची जबाबदारी न देता बीटगार्ड्संना कार्यालयात बसवून कार्यालयाची शोभा वाढविण्यात येत असल्याचे हंगामी वनमजुरांमध्ये बोलले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, हंगामी वनमजुरांचे काम जंगलात गस्त टाकण्याचचे असून त्या वनमजुरांना जेसीबी, ट्रॅक्टरवर काम करण्यास वनपरिक्षेत्राधिकारी भाग पाडत आहे. गत दोन वर्षांपासून असा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे या परिसरात जेसीबी, ट्रॅक्टर व मानवी हस्तक्षेप वाढला असून वन्यप्राण्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. काही वर्षापूर्वी या परिसरात १० ते १२ वाघांची संख्या होती.
उन्हाळ्यात तलावावर ५ ते ६ वाघ हमखास पहायला मिळायचे. मात्र आता हे चित्र बदलले असून वाघ व अन्य वन्यप्राण्यांचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. यासाठी वनविभागाच्या अधिकार्‍यांची बेफिकीरी व उदासिनता कारणीभूत असल्याचे वनमजुरांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.