नागपूर,दि.09 :महानगरपालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोन परिसरात घराबाहेर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास त्यांची रवानगी थेट शासकीय विगलीकरण कक्षात केली जाईल.तसेच नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले आहेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिसांना आणखी कठोर कारवाई करण्याची सूचना केली. नागपुरात पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही असा पोलीस बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या.सोबतच नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा थेट 270 वर पोहोचला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी परिश्रम घेत आहे. आतापर्यंत 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, संचारबंदी असतानाही काही नागरिक परिस्थितीला गांभीर्याने घेत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढला?
राज्यात सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात होती. सुरुवातीला नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपूरच्या संतरंजीपुरा परिसरात 68 वर्षीय कोरोनाबाधित मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पाहतापाहता आकडा वाढतच गेला.मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारे सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इथल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.





