१ जूनपासून अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे सुरू होणार;गोंदिया, तिरोडा व आमगाव येथे थांबा

तीन गाड्यांचे वेळापत्रक निश्चित मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक

0
651

गोंदिया दि 31 (जिमाका) भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १ जून २०२० पासून गैर श्रमिक नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ह्या अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे गाड्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक,नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तीन रेल्वे गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याच्या व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

गाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद – हावडा ही गाडी तिरोडा येथे १९.२५ वाजता पोहोचून १९.२७ वाजता सुटेल.१९.५८ वाजता गोंदिया येथे पोहोचून २० वाजता गोंदिया येथून निघेल. आमगाव येथे २०.१५ वाजता पोहोचून २०.१७ वाजता निघेल.                                                                                                                        गाडी क्रमांक ०२८३४ हावडा – अहमदाबाद ही गाडी १६.११ वाजता आमगाव येथे पोहोचेल. तेथून ती १६.१३ वाजता सुटेल.१६.४१ वाजता गोंदिया येथे आगमन व तेथून ती १६.४६ वाजता निघेल.तिरोडा येथे १७.०६ वाजता पोहोचेल व तेथून १७.८वाजता पुढील प्रवासासाठी निघेल.                                                                                      गाडी क्रमांक ०२८०९ मुंबई-हावडा विशेष रेल्वे १३.०८ वाजता गोंदिया येथे पोहोचेल. तेथून १३.१३ वाजता सुटेल.
गाडी क्रमांक ०२८१० हावडा-मुंबई विशेष रेल्वे गोंदिया येथे १२.०२ वाजता पोहोचून १२.०४ वाजता निघेल.              गाडी क्रमांक ०२०७० गोंदिया – रायगड जन्मशताब्दी एक्सप्रेस दुपारी १५ वाजता गोंदिया येथून सुटेल तर गाडी क्रमांक ०२०६९ रायगड – गोंदिया जन्मशताब्दी एक्सप्रेस दुपारी १३.२५ वाजता गोंदिया येथे पोहोचेल.

तरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रवाशांनी त्यांच्या मूळ गावी पोहोचण्याकरीता वेळापत्रकानुसार पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून प्रवास करावा.सदर रेल्वेची तिकिटे फक्त आय.आर.सी.टी.सी च्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल ऍप्सवर ऑनलाईन पद्धतीने ई-तिकीट स्वरूपात मिळतील.रेल्वे स्टेशनवर कोणतीही तिकिटे उपलब्ध होणार नसल्यामुळे रेल्वेस्टेशनवर अनावश्यक गर्दी टाळावी.

ज्या प्रवाशांचे ई-तिकिट निश्‍चित झाले आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश देण्‍यात येणार आहे. ज्यांची तिकीट निश्चित आहे, त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या पूर्वी दीड ते दोन तास अगोदर रेल्वे स्टेशनवर पोहोचावे.सर्व प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड -१९ ची लक्षणे आढळणार नाही त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांनी प्रवास करतांना आपल्यासोबत कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा. सर्व प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांनी स्टेशनवर आणि गाडीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.सर्व प्रवाशांनी शक्यतो आरोग्य सेतू ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. प्रवाशांनी प्रवास करतांना स्वतःचे भोजन व पाणी सोबत घ्यावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे