वाशिम, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. या गावांमधील शेतकऱ्यांनी बिजोत्पादन व बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यास त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
प्रकल्प शेत्रातील गावामध्ये प्रमुख पिकाचे हवामान अनुकूल वाणाचे बियाणे उपलब्ध व्हावे, तसेच बिजोत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम बनविण्यासाठी बिजोत्पादनात सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. प्रकल्प क्षेत्रातील अनुकूल वाणाच्या नोंदणीकृत बिजोत्पादन कार्यक्रमास सदर घटकांतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बिजोत्पादनासाठी प्रत्यक्ष खर्चाचा १०० टक्के व जास्तीत जास्त १५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. एका लाभार्थ्यास १० हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेता येईल.
सहकारी, निमशासकीय संस्थांच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकरी तसेच थेट बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी करून बिजोत्पादन घेणारे शेतकरी यांना अनुदान देण्यात येईल. प्रकल्प क्षेत्रातील गावामध्ये पिकाच्या हवामान अनुकूल वाणाच्या बिजोत्पादनाखाली जास्तीत जास्त क्षेत्र यावे, यासाठी इच्छुक शेतकऱ्यास जमीन धारणेबाबत कोणतीही अट नाही. म्हणजेच प्रकल्प क्षेत्रातील सर्वच शेतकरी या अनुदानाचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
बीबीएफ यंत्राने पेरणी करणाऱ्या एका लाभार्थ्यास २ हेक्टरपर्यंतच्या कमाल मर्यादेत प्रति हेक्टरी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. तसेच प्रती गाव जास्तीत जास्त २५ शेतकऱ्यांना ५० हेक्टरपर्यंत अनुदान देय राहील. प्रकल्प कालावधीत एका शेतकऱ्याला एकदाच लाभ घेता येईल. शेतीशाळामध्ये नोंदणी केलेल्या गेस्ट फार्मर यांना प्राधान्य राहील. ५ हेक्टरपर्यंत भूधारणा क्षेत्र असलेले शेतकरी या अनुदानास पात्र राहतील. शेतीशाळेच्या अॅपवर नोंदणीकृत बीबीएफ यंत्रधारकाकडून पेरणी करणे आवश्यक आहे, असे श्री. तोटावर यांनी कळविले आहे.
बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे फायदे
बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास एकरी ८ किलो बियाणाची बचत होते. वाफ्यावर पिकाच्या चार रांगा पेरल्या जातात. प्रत्येक चार रांगानंतर सारी पडते. त्यामुळे जास्त पाऊस पडल्यास जास्तीचे पाणी सरीवाटे निघून जाते व मूळ कुजत नाही. तसेच कमी पाऊस पडल्यास सरीमध्ये पावसाचे पाणी मुरते. त्यामुळे शेतामध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो. अंतर मशागतीची कामे सोईची होतात.
जमिनीत ३ ते ४ इंचवर बियाणे पडत असल्यामुळे पिकांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो व शेतात हवा खेळती राहते. विशिष्ट अंतरावर टोकन केल्याप्रमाणे बियाणे पडत असल्यामुळे पिक जोमदार येते व शेंगा जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे उत्पन्नात २० ते ३० टक्के वाढ होते.





