गोंदिया,दि.२०ः-जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला आत्ता हळूहळू जाग येऊ लागली असून गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती प्रकरणाला निकाली काढण्यास सुरवात झाली आहे.पदोन्नती प्रकरणाला घेऊन बेरार टाईम्स सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करीत आहे.त्यातच १८ जून रोजी काही पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.मात्र पदोन्नती देतांना ज्यांना पदोन्नती देण्यात आली,त्यांच्यापेक्षा अनेक वर्षापासून कार्यरत असणारे वरिष्ठांना मात्र डावलण्यात आल्याने पदोन्नतीसाठी जी यादी तयार करण्यात आली,त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी महेश केंद्रे यांच्याकडे हा प्रभार असून त्यांनी चुकीच्या पध्दतीने आणि आकसपुर्ण यादी तयार केल्यामुळेच पदोन्नती मिळालेल्यांपेक्षा अनेक वरिष्ठ अद्यापही असतांना त्यांना का डावलण्यात आले यावर खलबत्ते सुरु झाले आहेत.या सर्व प्रकरणामुळे सेवा जेष्ठता यादीत मोठा घोळ करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.वरिष्ठ सहाय्यकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी तर लिपिक वर्गियांना वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळालेल्यामध्ये अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे एस.के.तिवारी यांना पदोन्नतीवर गोरेगाव पंचायत समिती,नोकरीला कधीही इमानेइतबारे न करणारे सौरभ अग्रवाल यांना आमगाव पंचायत समिती,सामान्य प्रशासन विभागातील जंयत खोटेलेंना लघुपाटबंधारे विभाग तर सामान्य प्रशासन विभागातीलच कु.चित्रा ठेंगरी यांना त्याच कार्यालयात ठेवण्यात आले आहे.तर वरिष्ठ सहाय्यक पदावर सामान्य प्रशासन विभागात अजय खरवडे,सुरेंद्र सुर्यवंशी यांना अर्जुनी मोर तर हेमराज सुर्यवंशी यांना सामान्य प्रशासन विभागात पदोन्नती देण्यात आली आहे.या सर्वांना पदोन्नती मिळाली असली तरी यांच्यापेक्षा नोकरीत अधिक वर्ष झालेलेही काही कर्मचारी आहेत,त्यांना मात्र या पदोन्नतीतून डावलण्यात आल्याने त्या कर्मचाèयांची सेवाजेष्ठता यादी तयार करतांना जाणीव पुर्वक सामान्य प्रशासन विभागाने आकस ठेवल्याचेच दिसून येत आहे.





