वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, दुर्दैवाने रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर उपचारासाठी सर्व कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सज्जता ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात २९ जून रोजी झालेल्या कोरोना संसर्ग विषयक आढावा सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात असून सर्व शासकीय यंत्रणांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत योगदान दिले आहे. मात्र, आगमी काळात सुद्धा या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी असेच काम करावे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधितांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू नये, याची दक्षता घ्यावी.
स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी. कोविड केअर सेंटरमध्ये कर्तव्यावर असलेले डॉक्टर, भोजन व्यवस्था, स्वच्छता विषयक काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात फलकावर लावावेत. कोरोना बाधितावर उपचारासाठी आवश्यक औषधी व ऑक्सिजनचा पुरसा साठा उपलब्ध ठेवावा. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून जिल्हा सामान्य रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करावा. तसेच आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करावी. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. लॉककाळात पोलीस विभागाने केलेली कारवाई, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अन्नधान्य वितरण आदी बाबींचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य सुविधांकडे लक्ष वेधले. तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक उपाययोजनांची माहिती दिली.
आमदार श्री. पाटणी यांनी कोविड केअर सेंटरमधील सुविधांकडे लक्ष वेधले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना केली.
आमदार श्री. झनक यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत कार्यवाही करणेबाबत मुद्दा मांडला.
जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गविषयक सद्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून ११३० बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच याठिकाणी उपलब्ध असलेले मनुष्यबळ, सुविधा व साधनसामग्री याबाबत माहिती दिली.





