कुपोषित बालकांना दूषित अंड्यांचा पुरवठा

0
6

सडक-अर्जुनी,दि. ११- तालुक्यातील पांढरी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये कुपोषित बालकांना दूषित अंडी देत असल्याची बाब पालकांनी उघड केली आहे. या प्रकरणी जबाबदार संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, ८ जुलैला राजेंद्र शिवणकर रा.पांढरी यांची मुलगी हर्षी हिला सदर अंगणवाडी केंद्रामध्ये शिक्षणासाठी पाठविण्यात आले. ती जन्मापासूनच कुपोषित म्हणून गणल्या जात आहे. येथील अंगणवाडी सेविकेने त्या बालकांना उकडलेले अंडे दिले होते. त्या बालकांनी ते अंडे घरी नेऊन खाण्यास घेतले असता त्यामधून मेलेले कोंबडीचे पिल्लू निघाले. याची माहिती पालकांना कळताच त्यांनी मोहल्ल्यातील महिलांना घेवून पोलीस पाटील व सरपंच यांच्याकडे तक्रार दिली.
परंतु त्या व्यक्तींनी त्यांच्याकडे लक्ष न देता कसलीही कारवाई अथवा प्रकरणाची शहानिशा केली नाही. दुसर्‍या दिवशी अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यावर येथील अंगणवाडी सेविका व या परिसरातील सुपरवाईजर आल्या असताना त्यांच्यासमोर सेविकेची कानउघडणी करण्यात आली.
असे प्रकरण घडत राहिल्यास चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही अंडी कोणी पुरविली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. चिमुकल्या मुलांविषयी संबंधित विभागाने कारवाई करून आहाराचा पुरवठा करणार्‍यावर कारवाई करावी आणि याची चौकशी व्हावी, अशी मागणी कयादू राजेंद्र शिवणकर, वंदना मधुकर चौधरी, हेमलता राजेंद्र कोरे, योगीता फुंडे, लक्ष्मी खांदारे यांनी केली आहे.