इस्त्रोची घे भरारी, पाच ब्रिटीश उपग्रहांसह PSLV – C २८ झेपावले

0
11

वृत्तसंस्था

श्रीहरीकोटा दि. ११: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संदेशवहनाच्या नव्या पर्वात पदार्पण करीत शुक्रवारी रात्री श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही- सी २८ या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून १४४० किलो वजनाचे पाच ब्रिटिश उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केली. इस्त्रोची ही आजवरची सर्वात अवजड व्यावसायिक अंतराळ मोहीम आहे.

रात्रीचा अंधार भेदत पीएसएव्ही-सी-२८ हे उपग्रह प्रक्षेपण वाहन सतीश धवन अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी रात्री ९.५८ वाजता अंतराळात झेपावले. त्यानंतर २० मिनिटांनी हे पाचही उपग्रह सौर-समकालीन कक्षेत स्थिर करण्यात आले. ही अत्यंत यशस्वी मोहीम ठरली, अशा शब्दात इस्त्रोचे चेअरमन किरण कुमार यांनी आनंद व्यक्त केला. नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांनीही यावेळी एकमेकांचे अभिनंदन करीत जल्लोष केला.
अंतराळात पाठविलेल्या पाचही उपग्रहांचे एकूण वजन १४४० किलोगॅ्रम इतके आहे. इस्रो आणि ऍन्ट्रिक्सतर्फे आजवरच्या इतिहासात इतके जड उपग्रह आकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे, असे इस्रोने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.
‘पीएसएलव्ही सी-२८’ या यानाची ही १३ वी कामगिरी होती. यातील तीन उपग्रह अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी आहेत. ‘डीएमसी-३’ असे या उपग्रहांचे नाव असून, ते सर्व्हे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि ब्रिटनने संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित केले आहेत. यातील प्रत्येक उपग्रहाचे वजन ४४७ किलो आहे. पीएसएलव्ही-एक्सएलच्या मदतीने या उपग्रहांना सूर्याच्या ६४७ किमीच्या समकालिक कक्षेत पाठविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त पीएसएलव्हीच्या माध्यमातून ब्रिटनचा ‘सीबीएनटी-१’ हा अर्थ ऑब्झव्हेटर अर्थ सॅटेलाईट आणि ‘डी-आर्बिटसेल’ हा नॅनो सॅटेलाईटही अंतराळात पाठविण्यात येणार आहे, असे इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले. विशेष म्हणजे १९९९ पासून आतापर्यंत भारताने विविध देशांचे ४० उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.