भंडारा दि.१४: जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘गोसेखुर्द’ प्रकल्पाच्या कालवे बांधकामात मागील सरकारने जो गैरव्यवहार केला त्याची एसआयटी चौकशी सुरू आहे. असे असले तरी या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
२१ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. केंद्र सरकारने जातीनिहाय केलेली जनगनणा हे मोठे उद्दिष्ठ पार झाले. पूर्वी अनुसूचित जाती व जमातीची जनगणना व्हायची. परंतु ओबीसी, खुला प्रवर्ग, भटक्या जमातीची जनगणना होत नव्हती. जातीनिहाय जनगनणेचा अहवाल आल्यानंतर देशात ८0 टक्के लोक आर्थिकदृष्ट्या मागे तर २७ टक्के अरबपतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्यासाठी जातीनिहाय जनगणना म्हत्त्वाची होती. ती विद्यमान केंद्र सरकारने करुन भक्कम पाया रोवला आहे. जिल्हा परिषदेत १३ जागा असल्यामुळे कुणासोबत युती करणार या प्रश्नावर ते म्हणाले, व्यूहरचना आखण्यात आली आहे. बघू या कोण कुणासोबत जाते, ते अशी सावध प्रतिक्रिया दिली.
भारत हेवी इलेक्ट्रीक लिमिटेडचा मुंडीपार येथे होऊ घातलेला कारखाना पूर्ण होईल. त्यासाठी केंद्र शासनाने २,७00 कोटी रुपये मंजूर केले. तत्कालीन सरकारने कॅबिनेटच्या मंजुरीविना घोषणा केली होती. ती पूर्णत: चुकीची होती. आता केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून त्याचे सुतोवाच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केले असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला भाजप महामंत्री भरत खंडाईत, विकास मदनकर, सुर्यकांत ईलमे, आरीफ पटेल, संजय मते उपस्थित होते.





