मुंबई, दि. 1 – ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरुवारी नानावटी रूग्णालयात वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरमुळे आजारी होते. या जीवघेण्या आजारासोबतची त्यांची लढाई अखेर आज अयशस्वी ठरली.
कामगार क्षेत्रात अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व राव करत होते. महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट अशा विविध कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व करताना हजारो आंदोलने राव यांनी केली आहे. दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांच्यानंतरचे एकमेव लढवय्ये नेतृत्त्व म्हणून राव यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने उभे कामगार विश्व पोरके झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन
काळी पिवळीच्या भीषण अपघातात तीन ठार पाच जखमी
बुलढाणा दि. 1-समोरून येणाऱ्या बसला कट मारून भरधाव काळी पिवळी रोडच्या कडेला जाऊन पालटली. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले व पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहे. ही दुर्घटना गुरुवारला सकाळी ११ वाजेच्या सुमारास चिखली रोडवरील मुंगसरी फाट्यानजीक घडली.काळी पिवळी क्र. एमएच-२८-२२०५ ही प्रवासी घेऊन मेहकर वरून चिखलीकडे भरधाव वेगात निघाली होती. समोरून येणारी बस क्र. एमएच-४०-९५७९ ला कट मारून काळी पिवळी रोडच्या कडेला असलेल्या आडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, काळी पिवळी मधील फिरोज शेख, जब्बार शेख, शिवाजी उत्तम देशमुख व गणेश माधव काकडे हे तिघे जागीच ठार झाले. तर पाच प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाता प्रकरणी एस.टी. बस चालक प्रदीप जाधव (वय ४२) यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी काळी पिवळी चालक अब्दुल इमीद अब्दुल कादर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अवयवदानामुळे दुसऱ्यांना जीवन जगण्याची संधी – डॉ.विजय सूर्यवंशी
अवयवदान अभियानाचा समारोप
गोंदिया,दि.१ : मानवाला डोळे, यकृत, हृदय व मुत्रपिंड यासारख्या अवयवांची दिलेली अवयवरुपी भेट ही मृत्यूनंतरही दुसऱ्या गरजू रुग्णांना दान करता येवू शकते व मृत्यूच्या क्षणावर असलेल्या रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आज १ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे महाअवयवदान अभियानाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, प्रा.डॉ.व्ही.पी.रुखमोडे, प्रा.डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन, जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी राज्यात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत महा अवयवदान अभियान राबविण्यात आले. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मरावे परी अवयवदानारुपी उरावे असेच म्हणावे लागेल. मृत्यूनंतर आपल्या शरीरावर आपला काहीच अधिकार राहत नाही, तो मातीमोल असतो. परंतू अवयवदानामुळे आपण मृत्यूनंतरही एका नवीन व्यक्तीला जीवनदान देवू शकतो असेही त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हा निसर्गसंपन्न असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात वनसंपदा व जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. आपल्या कारकिर्दीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले याचा आपल्याला अभिमान असून या महाविद्यालयाचे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.अजय केवलीया व डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी शासनाकडून महा अवयवदान अभियान राबविण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली व त्याचे महत्व पटवून दिले व मृत्यूनंतर प्रत्येकाने अवयवदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अवयवदान महान कार्य या विषयावरील व्याख्यानातून डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन व श्री.जैन यांनी मार्गदर्शन केले. महा अवयवदान निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल, मनोहर म्युन्सीपल हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनियर कॉलेज, डी.बी.सायंस कॉलेज, एस.एस.ए.एम.गर्ल्स हायस्कूल व श्रीमती सरस्वतीबाई महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला डॉ.सुरेखा मेश्राम, डॉ.तोटे, डॉ.श्रीखंडे, डॉ.जयस्वाल, यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.संगीता भलावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रवीण जाधव यांनी मानले.
रिलायन्स जिओने लाँच केली 4G सेवा, 50 रुपयात 1GB डाटा
मुंबई, दि. 1 – रिलायन्सने बहुप्रतिक्षित जिओ 4G सेवेचं लाँचिंग केलं आहे. मुंबईतील रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जिओ 4G सेवा लाँच केली. मुकेश अंबानी यांनी 4G सेवेचं लाँचिंग करताना ग्राहकांसाठी खुशखबरही दिली आहे. जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी यावेळी केली.
5 सप्टेंबरपासून जिओचं सिमकार्ड उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना संपुर्ण देशभरात रोमिंग सेवेसहित एसटीडी, लोकल कॉलिंग सेवाही मोफत मिळणार आहे. सिमकार्डवर 50 रुपयांमध्ये एक जीबी डाटा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त 25 टक्के मोफत डाटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 18 हजार शहरं आणि 2 लाख गावांमध्ये ही सेवा पोहोचवण्यात येणार असून 4G मुळे नव्या डिजिटल युगाची सुरुवात होत असल्याचं मुकेश अंबानी बोलले आहेत.
सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.
जिओ सिमकार्ड मिळवायचं असेल तर गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर आलेल्या सुचनांना फॉलो केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरमध्ये गेल्यास सिमकार्ड उपलब्ध होईल.
एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली, दि.१:राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील ८ ते १० वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बाद करण्याच्या हालचाली शासनाने सुरु केल्याच्या निषेधार्थ या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली व्यथा सांगितली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु झाल्यानंतर राज्यात १८ हजार, तर जिल्ह्यात ७५० कर्मचारी मागील ८ ते १० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, जिल्हास्तरीय कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहायक, लेखापाल, तालुका समूह संघटक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एलएचव्ही, एएनएम, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या कामाची रुपरेषा नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच असून, त्यानुसारच ते काम करीत आहेत. या सर्वांची नियुक्ती सरळसेवा भरतीच्या मानांकनानुसार झाली असल्याने त्यांच्या अनुभवाचा विचार करुन सर्वांना शासन सेवेत रिक्त असलेल्या समकक्ष पदावर विनाशर्त सामावून घेण्याकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शिवाय वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने एनआरएचएममधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २४ ते ३१ ऑगस्टपर्यंत काळी फित आंदोलन केले. परंतु शासनाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सुप्रसिद्ध वर्हाड़ी कवी श्री शंकर बड़े यांचे निधन
यवतमाळ -प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक बाबासाहेब उर्फ शंकर बडे यांचा उपचारा दरम्यान संजीवनी रुग्णालयात दुख:द निधन झाले. त्यांचे वय ६९ वर्ष हाेते. त्यांच्यामागे पत्नी काैसल्या मुली भारती, निता, किर्ती व मुलगा गजानन बराच माेठा आप्त परीवार आहे. आज १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता पेशवे प्लॉट येथील त्यांच्या निवासस्थाना वरुन अंत्ययात्रा निघेल. ऑर्केस्ट्रामधून संचलन आणि वऱ्हाडी बाेलीतुन कवितांचे तसेच वऱ्हाडी व्यक्तीचित्रांचे साभिनय सादरीकरण बेरिस्टर गुलब्याचे हजाराे प्रयाेग राज्यात त्यांनी सादर करुन प्रचंड लाेकप्रीयता मिळविली हाेती. विदर्भ साहित्य संघ संमेलनाचे आर्णी येथे ते अध्यक्ष हाेते. त्यांचे ईरवा सगुण मुकुट हे तीन काव्यसंग्रह प्रसिधद असुन दै सकाळ मधील धापाधुपी हे सदर वाचकप्रीय ठरले. त्या लेख संग्रहाचे पुस्तक येऊ घातले हाेते. मतदान करण्याच्या शासकीय माेहिमेचे ते ब्रांड एम्बासिडर हाेते.
२0 लाख गेले कुठे-खा. विरसींग
गोंदिया : बहुजन समाज पार्टीचा सेक्टर पदाधिकारी मेळावा सिव्हील लाईन येथील केमीस्ट भवनात महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अँड. खा. विरसींग यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी प्रदेश अध्यक्ष विलास गरूड, प्रेम रोडेकर, कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, विश्वास राऊत, मिलींद बंसोड, युवराज जगणे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विरसींग यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली.काळ्या धनातून प्रत्येकाच्या खात्यात २0 लाख जमा होणार होते ते गेले कुठे, असा टोलाही त्यांनी लावला.कार्यक्रमाची प्रस्तावना पंकज वासनिक, संचालन मिलींद बंसोड व आभार युवराज जगणे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी दुर्वास भोयर, जनार्दन बनकर, डॉ. एल.एस.तुरकर, कमल हटवार, जी.बी.बागडे, पवन टेकाम, दिनेश गेडाम, आनंद बडोले, मनोहर ठाकरे, कुंदा गाडकीने, नुरलाल उके, कैलाश बोरकर, सुजीत वैद्य, संकल्प खोब्रागडे, विनोद खोब्रागडे, सुर्यकुमार बोंबार्डे, मंदीप वासनिक, रंजीत वासनिक, रंजीत बंसोड, डेविड बडगे, विरु उके यांनी सहकार्य केले
रांगोळी, पोस्टर्स, निबंध व वक्तृत्व स्पर्धा अवयवदानाची मिळाली प्रेरणा
महा अवयवदान अभियान – २०१६
गोंदिया, दि. १ :- ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान आयोजीत महा अवयवदान अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आबालवृध्दांपासून सर्वाचाच सहभाग यामध्ये मिळत आहे. अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी या अभियानाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय गोंदिया येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महा अवयवदान या विषयावर रांगोळी स्पर्धा, महा अवयवदान या विषवर पोस्टर्स स्पर्धा, अवयवदान- सर्वश्रेष्ठ दान या विषयावर निबंध स्पर्धा, आणि अवयवदान- महानकार्य या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेतून अवयवदानाचे महत्व विषद करण्यात आले. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतून तर विद्यार्थ्यानी अवयवदानाचे महत्व व आवश्यकता स्पष्ट केली. या स्पर्धेमुळे अनेकांना अवयवदान करण्याची प्रेरणा मिळाली.
गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल,मनोहर म्युसीपल हायस्कूल, व ज्युनिअर कॉलेज,मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनिअर कॉलेज,डि.बी.सायंस कॉलेज,एस.एस.ऐ.एम गर्ल्स हायस्कूल, व श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी या स्पर्धामध्ये सहभाग घेतला.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही.पी.रुखमोडे, प्रा.डॉ.आर.एल.कांबळे, प्रा. डॉ.मकरंद व्यवहारे, प्रा.डॉ. सुरेखा मेश्राम, प्रा.डॉ.खन्नाडे, प्रा.डॉ.सुनंदा श्रीखंडे, प्रा.डॉ.संजीव चौधरी, प्रा.डॉ.प्रवीण जाधव, प्रा.डॉ.कवीता जैसवाल, प्रा.डॉ.संगीता भलावी, व डी.बी.सायंस कॉलेजचे प्रा.डॉ.गुणवंत गाडेकर यांनी काम पाहिले.
पेट्रोल, डिझेल महागले
नवी दिल्ली (पीटीआय)- पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्क्यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात सुरू होती. याआधी 16 ऑगस्टला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्यात आली होती. मागील पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात सुमारे 13 टक्के म्हणजेच प्रतिबॅरल 5 डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच, पेट्रोलियम उत्पादनांच्या भावातही वाढ झाली आहे. चालू आंतरराष्ट्रीय भावानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची गरज होती, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे. मागील पंधरवड्यामधील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि डॉलरचा भाव पाहून आयओसीसह सरकारी मालकीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात.
हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी
वृत्तसंस्था
हैदराबाद – मुसळधार पावसाचा फटका दिल्ली पाठोपाठ हैदराबादला बसला असून, येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत सात जण मरण पावले असून, त्यातील तीन जण भिंत कोसळल्याने मरण पावले आहेत. त्यातील तीन जण हे रामनथपूर येथील असून उर्वरित चौघे भोलकपूर भागातील आहेत. इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाइकांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना कार्यालयात एक तास उशिराने येण्याची परवानगी दिली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 15 वर्षांतील झाला नाही इतक्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.