रिलायन्स जिओने लाँच केली 4G सेवा, 50 रुपयात 1GB डाटा

0
15

मुंबई, दि. 1 – रिलायन्सने बहुप्रतिक्षित जिओ 4G सेवेचं लाँचिंग केलं आहे. मुंबईतील रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जिओ 4G सेवा लाँच केली. मुकेश अंबानी यांनी 4G सेवेचं लाँचिंग करताना ग्राहकांसाठी खुशखबरही दिली आहे. जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी यावेळी केली.

5 सप्टेंबरपासून जिओचं सिमकार्ड उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना संपुर्ण देशभरात रोमिंग सेवेसहित एसटीडी, लोकल कॉलिंग सेवाही मोफत मिळणार आहे. सिमकार्डवर 50 रुपयांमध्ये एक जीबी डाटा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त 25 टक्के मोफत डाटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 18 हजार शहरं आणि 2 लाख गावांमध्ये ही सेवा पोहोचवण्यात येणार असून 4G मुळे नव्या डिजिटल युगाची सुरुवात होत असल्याचं मुकेश अंबानी बोलले आहेत.

सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.

जिओ सिमकार्ड मिळवायचं असेल तर गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर आलेल्या सुचनांना फॉलो केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरमध्ये गेल्यास सिमकार्ड उपलब्ध होईल.