एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
10

गडचिरोली, दि.१:राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील ८ ते १० वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बाद करण्याच्या हालचाली शासनाने सुरु केल्याच्या निषेधार्थ या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली व्यथा सांगितली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु झाल्यानंतर राज्यात १८ हजार, तर जिल्ह्यात ७५० कर्मचारी मागील ८ ते १० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, जिल्हास्तरीय कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहायक, लेखापाल, तालुका समूह संघटक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एलएचव्ही, एएनएम, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या कामाची रुपरेषा नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच असून, त्यानुसारच ते काम करीत आहेत. या सर्वांची नियुक्ती सरळसेवा भरतीच्या मानांकनानुसार झाली असल्याने त्यांच्या अनुभवाचा विचार करुन सर्वांना शासन सेवेत रिक्त असलेल्या समकक्ष पदावर विनाशर्त सामावून घेण्याकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शिवाय वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने एनआरएचएममधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २४ ते ३१ ऑगस्टपर्यंत काळी फित आंदोलन केले. परंतु शासनाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.