31.2 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 6493

बंगला न सोडणारे मंत्री

0

मुंबई – राष्ट्रपती राजवट संपून नवीन सरकार आले तरी आघाडी सरकारच्या ४१ पैकी २२ मंत्र्यानी सरकारी बंगले अद्याप रिकामे केलेले नाहीत, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील जन माहिती अधिकारी यांनी गलगली यांना माहिती अधिकारात मंत्र्यांच्या घराची माहिती मागितली होती. राज्यात ४१ मंत्री होते. त्यातील केवळ १९ मंत्र्यानीच सरकारी बंगले खाली केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.अजित पवार, नारायण राणे, छगन भुजबल, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, डॉ. पतंगराव कदम असे २२ मंत्री आहेत.ज्यांनी अद्याप सरकारी बंगला सोडलेला नाही.सरकारी नियम असा आहे की, मंत्रिपद जाताच बंगला सोडणे अनिवार्य असते. मंत्रिपदावरून मुक्त होताच पहिले १५ दिवस सर्व सुविधा विनामूल्य असते. शासनाच्या परवानगीनंतर पुढील महिने राहिल्यास २५ रुपये प्रति चौरस फूट दर आहे. त्यानंतर शासनाच्या परवानगीने राहिल्यास ५० रुपये प्रति चौरस फूट भाडे आकारण्यात येते, असा नियम आहे.

बंगला न सोडणारे मंत्री
अजित पवार , छगन भुजबळ, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, अनिल देशमुख, जयदत्त क्षीरसागर, मनोहर नाईक, डॉ. अब्दुल सत्तार , डॉ. जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, दिलीप सोपल, राजेश टोपे, नसीम खान, हसन मुश्रीफ़, संजय देवतळे, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय सावकारे, सतेज पाटील, डी. पी. सावंत.

खातेवाटप ; गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच

0

मुंबई – महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारचे खातेवाटप जवळपास निश्चित झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते आपल्याकडे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले आहे. तर, अर्थ खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शालेय शिक्षण व उच्च, तंत्रशिक्षण दोन विभाग एकत्र करत मनुष्यबळ विकास असे नवे खाते निर्माण करून त्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे.
शिक्षक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार व पणन मंत्रालय देण्यात येणार आहे. तर, विष्णू सवरा यांना आदिवासी विकास तर पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे ग्रामविकास खाते असणार आहे. मुंबईतील आमदार प्रकाश मेहता यांच्याकडे खाण व उद्योग मंत्रालय असणार आहे.
खातेवाटप पुढीलप्रमाणे –
देवेंद्र फडणवीस – गृह आणि नगरविकास
एकनाथ खडसे – महसूल
सुधीर मुनगंटीवार – अर्थ
पंकजा मुंडे – ग्रामविकास
विनोद तावडे – उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण आणि शिक्षण
चंद्रकांत पाटील – सहकार आणि पणन
विष्णू सावरा – आदिवासी विकास
प्रकाश मेहता – खाण व उद्योग

उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचा हट्ट कायम

0

मुंबई – शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदाचा आग्रह कायम ठेवला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मित्राबरोबर वाटचाल तर करायची आहे. पण, त्याबद्दलचा निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट करीत शिवसेनेच्या मागण्यांसंबंधात फारशी तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत त्यांनी दिल्याचे मानले जाते. दरम्यान, येत्या १०,११ आणि १२ नोव्हेबर रोजी विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून, शेवटच्या दिवशी सरकार आपले बहुमत सिद्ध करणार आहे.
उपमुख्यमंत्रिपदासह ८ ते १० महत्त्वाची खाती मिळावीत, या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहेत. शपथविधी समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानंतर ते शपथविधी समारंभाला उपस्थित राहिले होते. आता शिवसेनेने जेटली यांच्या माध्यमातून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधण्याचा मार्ग स्वीकारला आहे. जेटली यांच्याशी मागण्यांसंबंधात सविस्तर चर्चा करण्यासाठी देसाई आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. तसेच शिवसेनेतील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच अर्थ, ऊर्जा, सहकार, आरोग्य आणि शिक्षण ही महत्त्वाची खाती हवी असल्याचे मुंबईत पत्रकारांशी बोलताना नमूद केले. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार योग्यपद्धतीने चालू शकत नाही याची जाणीव ठेवावी, असेही काही शिवसेना नेत्यांचे मत आहे. त्याच वेळी शिवसेनेच्या काही नेत्यांनी दोन कॅबिनेट मंत्रिपदे आणि तीन राज्यमंत्रिपदे एवढ्या मागण्या मान्य झाल्या तरी त्या पुरेशा आहेत, अशी भूमिका घेतली आहे. भाजप आणि शिवसेनेदरम्यान २:१ असे मंत्रिपदाचे प्रमाण राहावे, असा शिवसेनेतील काही नेत्यांचा आग्रह होता. मात्र, आता हा आग्रह पक्षाने सोडला असल्याचे सांगितले जाते.

मुख्यमंत्री फडणवीस यांची शिवसेनेशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. यासंदर्भातील बोलणी केंद्रीय पातळीवरच हाताळली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण मित्र आहोत, त्यामुळे आपल्याला एकत्रितपणे सामोरे जायचे आहे, असे आपण शिवसेना नेत्यांना कळवले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. खातेवाटपात त्यांना नेमके काय दिले जाईल याबद्दल कमालीचे मौन बाळगले जाते आहे. शिवसेना नेते मागण्यांसंबंधी आग्रही राहिले, तर अल्पमतातील सरकार चालवायचा निर्णय भाजप घेईल काय, याबद्दल उत्सुकता आहे. भाजपने कोणताही स्पष्ट प्रस्ताव अद्याप न पाठवल्याने नेमके काय करायचे, याबद्दल शिवसेनेत काहीसा गोंधळ असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना‘तून भाजपवर होणाऱ्या टीकेबद्दलही नेत्यांनी संताप व्यक्‍त केला आहे.

खातेवाटपाची घोषणा नाहीच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाची घोषणा उशिरापर्यंत केली नव्हती. शिवसेनेबरोबर सुरू असलेल्या चर्चेमुळे ही घोषणा राखून ठेवली आहे काय, असा प्रश्‍न केला जात होता. मात्र, घोषणा लांबण्याचे कारण शिवसेना नसून भाजपच्या काही बड्या नेत्यांनी चालवलेला आग्रह असल्याचे सांगण्यात येत होते.

खातेवाटप विलंबाबद्दल मंत्रीही चकित
नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर केले जाणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायंकाळी पत्रकारांशी बोलताना रात्री उशिरा ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे म्हटले होते. यामागे शिवसेनेच्या सहभागाविषयीचे कारण असावे, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे खातेवाटप लांबल्याची चर्चा सुरू होती. आधी जाहीर केल्याप्रमाणे आज खातेवाटप का झाले नाही, याबाबत मंत्रीही आश्‍चर्य व्यक्त करीत असल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांची चैत्यभूमीला भेट

0

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी दादरच्या सावरकर राष्ट्रीय स्मारकास तसेच शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख​ दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही भेट देऊन अभिवादन केले.
चैत्यभूमी परिसराचे सुशोभिकरण कालबद्ध पद्धतीने करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी मंत्रिमंडळातील सदस्य विनोद तावडे, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, दिलीप कांबळे तसेच आमदार आशिष शेलार, मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस सांगणार दावा

0

मुंबई- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास कोणतीही अडचण नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विशेष अधिवेशनापूर्वी होईल. त्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गांधीभवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारला येत्या पंधरा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनाही सत्तेत सहभागी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे ठाकरे म्हणाले.
यापूर्वीही काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे एक सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राज्यातील जनतेसाठी विधानसभेत काम करणार आहे. विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांकरता काँग्रेस निश्चितच सरकारला पाठिंबा देईल. मात्र सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येणा-या गोष्टी सरकारकडून होणार असतील, तर त्याला सभागृहाबरोबरच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरूनही विरोध केला जाईल. काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना, सर्व समाजघटकांना दिलेली आरक्षणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसकडून विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेनंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास आपोआप हे पद काँग्रेसला मिळण्यात काही अडचण येणार नाही. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे.

कार्तिकीची महापूजा एकनाथ खडसेंच्या हस्ते

0

सोलापूर – दरवर्षी प्रथेप्रमाणे कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. पण नव्या सरकारमध्ये हे पद नसल्याने महापुजेचा मान ज्येष्ठ मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. त्यामुळे सोमवारी (ता.३) कार्तिकीची महापूजा खडसे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्तिकी एकादशीचा सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची रिघ पंढरीत लागली असून, आज (शनिवारी) दुपारी दर्शन रांग चंद्रभागा घाटाच्यापुढे गोपाळपूर रस्त्याच्या शेडपर्यंत गेली होती. चंद्रभागेच्या वाळवंटासह नगरप्रदक्षिणा मार्गावरही विठुनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. सुमारे दीड लाख वारकरी दाखल झाले आहेत. कार्तिकीचा मुख्य सोहळा सोमवारी असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून एस.टी. आणि रेल्वेसह वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. राज्याच्या काही भागातून विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्याही येत आहेत. पंढरपुरातील गर्दी क्षणोक्षणी वाढते आहे. शहरातील धर्मशाळा, मठ, आश्रमांमध्ये किर्तन, प्रवचन, भजनाचे सूर आळवले जात आहेत. वाळवंटातही ठिकठिकाणी भजने आणि किर्तने सुरु आहेत. टाळ-मृदंगाच गजर आणि ज्ञानोबा-तुकाराम…माऊली-माऊलीचा जयघोषाने वातावरण भक्तिने भारुन गेले आहे. विशेषतः वाळवंटासह नगरप्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची गर्दी वाढते आहे. याच भागात खेळणी, प्रसादाच्या विक्रेत्यांमुळे हा मार्ग फूलून गेला अहो. दर्शनरांगेत शनिवारी वारकऱ्यांची गर्दी आणि वेगही वाढला.

नाथाभाऊंना पावला ‘विठ्ठल‘
आषाढी यात्रेत शासकीय महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असा रिवाज आहे. पण नव्या सरकारची आताच स्थापना झाली आहे. शिवाय या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री हे पद नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापुजा करतील, अशी शक्‍यता होती. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना महापुजेसाठी मान दिला आहे. त्यामुळे आता सोमवारी (ता.३) पहाटे अडीच वाजता खडसे यांच्या हस्ते सपत्निक ही महापुजा होईल. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून खडसे अनेकदा महापुजेला उपस्थित राहिले. पण सत्ताधारी मंत्री म्हणून त्यांच्या हस्ते महापुजा होत असल्याने खऱ्या अर्थान नाथाभाऊंना विठ्ठल पावला, असे म्हटले जाते आहे.

राज ठाकरेंनी घेतली पाथर्डीतील दलित कुटुंबीयांची भेट !

0

पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणार्‍या पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटाच आहेत. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर राजकीय पक्षांनी पाथर्डीकडे धाव घेतलीये. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवखेडा इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

पाथर्डीतल्या जवखेडामध्ये तिहेरी हत्याकांड होऊन आता ११ दिवस उलटले आहेत. पण अजूनही या हत्याकांडातले आरोपी मोकाटच आहेत. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पाथर्डी तालुक्यातल्या जवखेडात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित कुटुंबीयांना त्यांनी १ लाख रुपये मदतीची घोषणा केली. तसंच मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट घालून देणयाचं आश्वासनही दिलं. राज ठाकरे यांच्यासोबत गटनेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सुद्धा होते. यापूर्वीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले या नेत्यांनी भेट दिलीये. या हत्याकांडाच्या विरोधात राज्यभर निदर्शनंही करण्यात आली. अहमदनगर जिल्हाच अत्याचारग्रस्त जाहीर करावा अशी मागणीही करण्यात येतेय…!!

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री

0

मुंबई -वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक अशा सोहळ्यात, खच्चून भरलेल्या गर्दीच्या साक्षीने विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या निमित्ताने भाजपचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत फडणवीस यांचा शपथविधी झाला. या सोहळ्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती खास अशी ठरली. शिवसेनेने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, आज दुपारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी फोन केल्यानंतर उद्धव यांनी बहिष्काराची तलवार म्यान केली. गर्दीमुळे उद्धव यांना काहीसा उशीर झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उद्धव तेथे पोहोचले. 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक धार्मिक गुरू, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
कॅबिनेट मंत्री -एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णु सावरा 

राज्यमंत्री -दिलीप कांबळे, विद्या ठाकूर

Welcomed CM Shri Devendra Fadnavis at Delhi residence

0

Welcomed CM Designate Maharashtra & Leader of BJP Legislative Party Shri Devendra Fadnavis at Delhi residence

मुख्यमंत्र्यांचे एक युनिट हैदराबाद हाउसमध्ये वर्षभर सज्ज राहणार

0

नागपूर – विदर्भाचे प्रश्‍न झटपट मार्गी लागावे तसेच वैदर्भीय जनतेला न्याय देता यावा याकरिता नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘रामगिरी‘वर स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे एक युनिट हैदराबाद हाउसमध्ये वर्षभर सज्ज राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
 
युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विदर्भ विकासाची श्‍वेतपत्रिका काढली होती. त्या अंतर्गत एक सचिव दर्जाचा अधिकारी नेमला होता. त्यांना रविभवनमध्ये कॉटेज उपलब्ध करून देण्यात आले होते. विदर्भाचे प्रश्‍न मुंबईत घेऊन येण्याचा त्रास लोकांना होऊ नये याकरिता ही व्यवस्था केली होती. आता मुख्यमंत्रीच नागपूरचा असल्याने यादृष्टीने पावले उचलण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांचे उपकार्यालय नागपूरमध्ये राहणार आहे. 
मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र विदर्भाची भूमिका लपून राहिलेली नाही. भाजपनेही सातत्याने छोट्या राज्यांचे समर्थन केले.  भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातसुद्धा वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भाचे वेगळे राज्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने वैदर्भीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाच वर्षे वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची शक्‍यता नाही. मात्र, लोकांच्या अपेक्षांच्या पूर्तीच्या दृष्टीने भाजप सरकारने उपकार्यालयाचे टाकलेले हे पहिले पाऊल राहील. कदाचित या कार्यालयाला स्वतंत्र दर्जाही मिळण्याची शक्‍यता वर्तविली जाते.