ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार

0
12

गडचिरोली,दि. १८ : : २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता येताच त्यांनी ओबीसी समाजाच्या भावनेशी खेळ करुन त्यांची फसवणूक केली. ओबीसींच्या मुद्द्यावर भाजपच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार, युवा नेते कुणाल पेंदोरकर उपस्थित होते.

आ.विजय वडेट्टीवार म्हणाले, कॉग्रेसने ओबीसींवर अन्याय केला, असे भाजपवाले म्हणायचे. पण, भाजपने तर ओबीसींवरील अन्यायाची परिसीमाच गाठली आहे. राज्यपालांनी नोकरभरतीची अधिसूचना काढल्यानंतर काँग्रेसचे तत्कालिन आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी राज्यपालांना पत्र लिहून अधिसूचनेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. भाजपचे खासदार व आमदारांनी असे एखादे तरी पत्र दाखवावे, असे आव्हान वडेट्टीवारांनी दिले.

एकीकडे अधिसूचनेचा पुनर्विचार करण्यासाठी समिती गठित झाल्याची माहिती खा.नेते देतात; आणि दुसऱ्याच दिवशी अनुसूचित जमातीसाठी पुन्हा ५ पदे वाढविल्याचा जीआर काढला जातो. याचा अर्थ खा.नेते यांना वस्तुस्थितीची माहिती नाही. केवळ हवेवरच्या गोष्टी करुन वेळ मारुन नेण्याचे काम खासदार आणि भाजपचे नेते करीत आहेत, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी केला. या जिल्ह्यात ओबीसी, आदिवासी व अन्य समाज अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व समाजाला नोकरीत आरक्षण मिळावे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले. भाजपने अन्यायाचा कळस गाठला असून, ओबीसींनी या जिल्ह्यात राहूच नये का? असा संतप्त सवाल आ.वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी समाज उदध्वस्त होत आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सत्ताधारी व विरोधी पक्षांची बैठक बोलावून न्याय द्यावा, अशी मागणीही आ.वडेट्टीवार यांनी केली.