स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन

0
47

विदर्भामधील कपाशी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन व कपाशीवर किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस योग्य प्रमाणात न झाल्याने विदर्भातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  मात्र, शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही, हाच मुद्दा हेरत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज सरकार विरोधात बंड पुकारण्यात आला. संग्रामपूर तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच मागील वर्षी ऑनलाईनच्या गोंधळामुळे अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज भरू शकले नाहीत, अशा वंचित शेतकऱ्यांना ५० टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

शासनाने १ ऑक्टोबरपर्यंत या मागण्या मान्य केल्या नाही, तर राज्यात दूध आणि उस आंदोलनाच्या धर्तीवर सोयाबीन व कपाशीसाठी आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.