कार्य.अभियंत्याचे दुर्लक्ष,गिधाड्या तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

0
23

गोंदिया,दि.06 : तालुक्यातील किडंगीपार येथील गिधाड्या तलावाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून शासकीय कार्यालयात धूळखात पडला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडे वांरवार तक्रार केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. या गिधाड्या तलावाच्या सौंदर्यीकरणाला लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा दुर्लक्षितपणा व कामकामाजाप्रती असलेली अनास्था भोवल्याचे दिसून येते.

डोंगरगाव क्षेत्राचे तत्कालीन जि.प.सदस्य मुनेद्र नांदगाये यांनी तत्कालीन जि.प.सदस्य विजय शिवणकर यांच्याकडे पाठपुरावा करुन किडंगीपार येथील गिधाड्या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला होता. जि.प.लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी तलावाच्या दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी २६ जून २०१५ ला सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या तलावाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत करण्यासाठी २०१५-१६ नियोजनात समावेश करण्यात आले होते.तलावाचे सर्वेक्षण झाल्यानंतर पिचींग, गेट,वाटरकोट,नाला बांधकामाकरिता अंदाजपत्रक तयार करण्यात आले. जानेवारी २०१६ पासून या तलावाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटून अद्यापही तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली नाही.या तलावाचे सौंदयीकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदारांनी सुध्दा शासनाकडे पाठपुरावा केला. पण अडेलतटू स्वभावाचे असलेले लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्याने मात्र त्यासाठी कुठलेच पाऊल न उचलता आपल्यालाच पारदर्शक सिध्द करण्यात वेळ घालवू लागले आहेत.