बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल

0
26

सालेकसा,दि.20ःःतालुक्यातील बोदलबोडी-भजेपार मार्गावर असलेल्या वाघ नदीवर पुलाची २0 वर्षाची तालुकावासीयांची मागणी आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली. मंगळवार, १८ जून रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या पुलाला मंजुरी मिळाली असून ६ कोटीचा निधी देण्यात आला आहे.विशेष म्हणजे प्रसारमाध्यामानी याकडे सातत्याने लक्ष वेधले होते,त्यानंतर कुठे लोकप्रतिनिधीनी लक्ष घातले.
सालेकसा ते साखरीटोला मार्ग हा तालुकावासीयांना देवरी तालुक्यात जाणारा महत्वाचा मार्ग आहे. याच मार्गावर बोदलगोडी ते भजेपार दरम्यान वाघ नदी वाहत असून सद्यस्थितीत असलेला पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलावरुन नेहमीच पाणी वाहत असल्याने अनेकदा दिवसेंदिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प पडते. परिणामी या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो, तर नागरिकांच्या महत्वाच्या कामांचाही खोळंबा होतो. याचा सर्वाधिक फटका हा आजारी व्यक्तींना सहन करावा लागतो. त्यामुळे गत २0 वर्षांपासून या नदीवर उंच पुलाची मागणी होत होती. दरम्यान, आमदार संजय पुराम यांनीही पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुलाच्या मागणीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. आ. पुराम यांच्या प्रयत्नाला यश आले असून १८ जून रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात वाघ नदीवर मोठ्या ब्रीज बांधकामाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ६ कोटीचा निधीही देण्यात आला.