31.7 C
Gondiā
Wednesday, May 15, 2024
Home Blog Page 5227

साकोलीत विदर्भ विरोधकांच्या विरोधात निषेध मोर्चा

0

साकोली,दि.३१-लोकसभेत भाजपचे भंडारा/गोंदियाचे खासदार नाना पटोले हे वेगळा विदर्भ विषयी खासगी विधेयक आणतायत अशी कुणकुण महाराष्ट्रातल्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली. त्यानंतर जणू काय आता संसदेत चर्चा होऊन लगेच विदर्भाचा वेगळा मुद्दा मांडला जाणार अशा आवेशात वातावरण तापवले गेले.वेगळ्या विदर्भाची मागणी ही देशाची फाळणी करणारी मागणी नसून, ही मागणी संविधानाला अनुसरूनच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या,पिडवणूक कशी दिसत नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्यामुळेच श्रीहरी अणे प्रणीत विदर्भ राज्य आघाडी साकोली तालुकाच्यावतीने शनिवारला काँग्रेस ,राष्ट्रवादीसह विदर्भाला विरोध करण्यार्या नेत्यांचा निषेध नोंदवीण्यासाठी शनिवारला साकोलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच सदर नेत्यांच्या पक्षांनी वेगळ्या विदर्भाची आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन करण्यात आले तसेच सरकारला निवेदन देण्यात आले.
विदर्भ राज्य आघाडी साकोली तालुक्याचे प्रभारी राकेश भास्कर यांच्या सोबत विदर्भवादी प्रवीण भांडारकर, दीपक जांभूळकर, शब्बीरभाई पठान, सुनील जांभूळकर, शिवदास भालाधारे, बाळू गिर्हेपुंजे, दीपक क्षीरसागर, लेविन्द्र तोडसाम, सचिन भुजाडे, अविकुमार उजवणे, अरविंद भुजाडे, नितीन मेश्राम, सोपान फरांडे, नितीन चंद्रवंशी, वसंता गोंधळे, रामू लांजेवार, जी.टी. राऊत, आर. एस. गोबाडे, ए.के.मेश्राम, मनीष क्षीरसागर, आकाश बन्सोड, नरेंद्र वाडीभस्मे, रुपेश गायकवाड, योगेश गिर्हेपुंजे, विवेक क्षीरसागर, रोहित लांजेवार, डेविड क्षीरसागर, भाविक लांजेवार, रजत बघेल, शैलेश सूर्यवंशी, नथ्थू नेवारे, प्रीतम सूर्यवंशी, विलास लांजेवार, सुनील सूर्यवंशी,गणेश सूर्यवंशी,रोहित वाडीवे, जाळी कापगते, मा.रा.गोमासे, उमेश भांडारकर, लेखीराम हर्षे, रैलीज मेश्राम, सुभम सोनटक्के, अनिकेत मेश्राम, उमेश सुरासावूत, रोमन लांजेवार, सोहम फटिंग व इतर हजर होते.मोर्चाला सहभागी होवून विदर्भ राज्य आघाडी च्या कार्याला बळकटी देण्याबद्दल समस्त विदर्भवाद्यांचे शब्बीरभाई पठान यांनी आभार मानले.

भंडार्यात ओबीसी सेवा संंघाची सभा उत्साहात

0

भंडारा,दि.31 -भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ व महिला ओबीसी संघाची संयुक्त सभा ओबीसी कार्यालय भंडारा येथे आज रविवारला आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्याजी लांबट होते.यावेळी लाखनीचे डा.अमित गायधनी,आजबले आणि महिला अध्यक्ष मंजुषा बुरडे उपस्थित होते.सर्व प्रथम संत नामदेव महाराजांना वंदन करुन त्यांच्या जिवणावर प्रकाश टाकण्यात आला. ओबीसी सेवा संघाचे कार्य घरा घरात पोहोचविण्याचे आवाहन करीत येत्या 7 आॅगस्ट रोजी आयोजित ओबीसी महाधिवेशनाला जिल्ह्यातून अधिकाधिक बांधवांना उपस्थित राहण्यासाठी प्रचार प्रसार करुन माहिती पोचविण्याचे ठरविण्यात आले.तसेच सर्व ओबीसी पदाधिकारी व समाज बांधवांनी अधिवेशनाला ऊपस्तीथ रहावे असे आवाहन करण्यात आले.संचालन गोपाल सेलोकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांनी केले तर आभार डा.कुकडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेकरीता आकरे,नाकाडे, सिगंनजुडे,गायधने,हुड ,सारवे मॅडम भारत मते शंभु बांडेबुचे सुधाकर मोथरकर वहीद शेख गोपाल देशमुख डा.महाजन शैलेश कुकडे वृंदा गायधने देवगडे घनश्याम यांनी सहकार्य केले.

आंतरराष्ट्रीय शहराप्रमाणे येत्या तीन वर्षात नागपूरचा विकास -देवेंद्र फडणवीस

0

Ø 200 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

Ø अविकसित लेआऊटच्या विकासासाठी 100 कोटी रुपये

Ø नागपूर जिल्हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा

Ø राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार

नागपूर, दि.31 : देशातील मध्यवर्ती व महत्वपूर्ण शहर म्हणून नागपूरचा विकास करतांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाची सांगड घालून येत्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय शहराप्रमाणे नागपूरचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विदर्भ वैधानिक विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात 354 दिव्यांगाना गरजेनुसार आधुनिक साहित्याचे वितरण तसेच दक्षिण- पश्चिम विधानसभा क्षेत्रातील दोनशे कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर विशेष पाहुणे म्हणून महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, इमारत बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मुन्नाजी यादव, आमदार सुधाकरराव कोहळे, मितेश भांगडीया, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदिप जोशी, रमेश शिंगाडे, अविनाश ठाकरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे
सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे, प्रा. राजीव हडप, श्रीमती सुमित्रा जाधव, प्रकाश भोयर आदी उपस्थित होते.

उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर शहराचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने मिहानसह विविध योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना दिली आहे.शहराच्या सर्वंच भागात मोठया प्रमाणात विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेसह सुरु असलेल्या कामामुळे रस्ते खोदून ठेवले आहे. येत्या तीन वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जनतेला सर्व सुविधा उपलब्ध होतील. या विकासकामासाठी जनतेचा सहभाग मिळविण्यासाठी कामाच्या कालमर्यादेचे माहिती फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावे व कामांचा दर्जा कायम राहावा, यासाठी नागरिकांची समिती तयार करावी अशी सूचना यावेळी केली.
नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे.या अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडण्यात येऊन शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील. जिल्हयात 350 सेवा 2 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन करुन या संपूर्ण सेवा मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार असल्यामुळे जनतेला यापुढे शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डिजीटल क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सेवा व सुविधा यामध्ये फरक राहणार नाही. 11 हजार डिजीटल शाळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी पालकांची संख्या वाढत आहे.यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रकाश भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप जोशी यांनी मानले. संचलन श्रीमती नंदा जिचकार यांनी केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त माधव झोड, मुख्यमंत्री सचिवालयाच्या श्रीमती आशा पठाण,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता प्रशांत रेशमे तसेच दिलीप दिवे, संजय भेंडे, अनिल वाहने,किशोर वानखेडे, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, आशिष पाठक, सचिन कारलकर,श्रीपाद बोरीकर आदी उपस्थित होते.

50 शेतकर्यांना सेंद्रिय खत तयार करण्याचे साहित्य वितरित

0

गोंदिया,दि.31 :- गोंदिया तालुक्यातील चुटिया गावातील प्रगत शील शेतकरी संजय टेंभरे यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय शेती करावी यासाठी आत्माच्या माध्यमातून चुटिया गावात सेंद्रीय शेती कार्यशाळचे आयोजन केले होते .या कार्यशाळेत आत्माचे अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते .तसेच या कार्यशाळेत कृषी अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे शेतकऱ्यांना महत्व पटवून दिले आणि शेंद्रीय खताची कशा पद्धतीने निर्मिती केली जाते. आणि शेंद्रीय शेतीतून उत्पादित फळ भाज्यां सेवन केल्याने काय फायादे होतात या वर मार्गदर्शन केले. तसेच प्रगतशील शेतकरी संजय टेंभरे यांनी आता पर्यत शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादनात कश्या प्रकारे भर पडते आणि या माध्यमातून आर्थिक उन्नती कशी साधता येईल यावर मार्गदर्शन करत ५० शेतकऱ्यांना सेंद्रीय खत तयार करण्याचे साहित्य वाटप केले त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सम्बंधित विभागणी आणखी शेतीच्या योजना शेतकर्यांन पर्यंत पोहचवाव्या अशी मागणी केली आहे

तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणिव करण्यासाठी तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवा – डॉ.विजय सूर्यवंशी

0

गोंदिया,दि.31 : तंबाखू खाण्यामुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. सोबतच कर्करोग होण्याची शक्यताही असते. शाळा परिसरातील दुकाने, पानटपरी, हॉटेल्समधून तंबाखूची विक्री होणार नाही, याकडे विशेष लक्ष दयावे. विद्यार्थी आणि लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करण्यासाठी तंबाखुविरोधी कार्यक्रम राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदयाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, सदस्य अन्न सुरक्षा अधिकारी ए.डी.राऊत, विक्रीकर उपायुक्त शिला मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया न.प.चे मुख्याधिकारी चंदन पाटील, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे, आरोग्य विभागाचे डॉ.पटले, न.प.गोंदियाचे डॉ.एन.एन.येडे, केटीएसचे डॉ.मनीष बत्रा, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.बबन मेश्राम, आकृती थिंक टूडेचे प्रमोद गुडथे यांची उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, गुडाखू व चैनीखैनीच्या उत्पादक कंपन्यांवर अन्न औषध प्रशासनाने धाड मारावी.तसेच या विभागाने दररोज दहा ठिकाणी धाडी मारुन संबंधित वस्तुंची तपासणी करावी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी कार्यक्रमात सहभाग करुन घ्यावे. जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांमधून तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवावे. विद्यार्थ्यांच्या घरी कोण तंबाखू, बिडी, सिगारेट, गुडाखू खातात याची माहिती संकलीत करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून सुध्दा तंबाखू खातात का याची माहिती घ्यावी.शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी सुध्दा शाळांमध्ये तंबाखू खाणे व धुम्रपानावर बंदी घालावी असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, शाळेच्या 100 मिटर परिसरात तंबाखू विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी.तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना जिल्ह्यात राबवावी. शाळामधून होणाऱ्या पालक सभेव व शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत तंबाखूविरोधी जनजागृती करावी. शाळा व परिसरात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींची गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.
डॉ.भुजबळ म्हणाले, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक हे आदी व्यसनमुक्त झाले पाहिजे. अन्न व औषध प्रशासन विभाग तंबाखू, गुटखा, गुडाखू यावर कारवाई करण्यासाठी धाडसत्र आरंभीत असेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथक देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ.पातुरकर यांनी 2 एप्रिल 2016 च्या शासकीय परिपत्रकानुसार दंड जमा करण्यासाठी, धुम्रपान निषेध क्षेत्राचे स्पेसीफिकेशन तसेच आयडीयल डायमेंशननुसार बोर्ड लावणे, कोटपा ॲक्ट 2003 ची मार्गदर्शक तत्वे व या कायदयानुसार तंबाखूमुक्त शाळा अंतर्गत शाळेच्या 100 मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थावर प्रतिबंध याविषयी माहिती दिली.

पशुधन विमा पंधरवडा राबविणार- मा. जानकर

0

मुंबई, दि. 30 : राज्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी या योजनेचा फार मोठा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत देशी, संकरीत (गायी,म्हशी), पाळीव पशु (घोडे, गाढव, वळू, बैल व रेडे) तसेच, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यापुढे मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनासाठी विमा सुरक्षा कवच मिळणार आहे.

योजनेंतर्गत लाभ देणेसाठी जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 5 गाय, म्हशी या मोठ्या जनावरांचा अथवा 50 शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे यांचा समावेश आहे. विमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्ष किंमतीवर आधारित असते. जनावरांची किंमत ही वय, स्वास्थ्य व दुध उत्पादनांवर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत निश्चित करण्यात येते. विमा रक्कमेच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनातर्फे भरण्यात येईल. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 70 टक्के पर्यंत शासनातर्फे अनुदान देण्यात येईल. उर्वरित 30 टक्के रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथील लाभार्थ्यांना 10 टक्के अधिकचे अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकः 31 ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी – राज्य निवडणूक आयुक्त

0

मुंबई, दि. 30 : राज्यात डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 195 व 19 नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत किंवा मतदार यादीत आपल्याशी संबंधित तपशिलांत दुरुस्त्या असल्यास त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी भारत निवडणूक आयोगातर्फे तयार केली जाते. तीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी 10 सप्टेंबर 2016 रोजी अस्तित्त्वात येणारी विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 रोजी किंवा तत्पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. तरच त्यांना नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईल; तसेच यापूर्वीच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतील तपशिलात बदल असल्यास त्यासाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचबरोबर दुबार नावे, स्थलांतरितांची नावे अथवा मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठीसुद्धा अर्ज करता येईल. त्यासाठीच्या अर्जांचे नमुने मतदार नोंदणी केंद्र; तसेच मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मतदार नोंदणीचा विषय भारत निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला असला तरी कुठलीही पात्र व्यक्ती नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम (NERP) राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी; तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींना दिले आहेत. त्याचबरोबर सर्व स्तरांवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, आपापल्या क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राचाऱ्यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच मतदार नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करणे; तसेच नागरिकांसाठी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या क्षेत्रांत आवश्यक तेवढे मतदार अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
नोव्हेंबर- डिसेंबर 2016 मध्ये निवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींची नावे: रायगड- उरण, पनवेल, खोपोली, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माथेरान गिरीस्थान. रत्नागिरी- दापोली न.पं., खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर. सिंधूदूर्ग- वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, देवगड- जामसांडे न.प. (नवनिर्मित). पालघर- विक्रमगड न.पं. (नवनिर्मित), मोखाडा न.पं. (नवनिर्मित), तलासरी न.पं. (नवनिर्मित). पुणे- जुन्नर, तळेगाव-दाभाडे, लोणावळा, शिरुर, आळंदी, दौंड, सासवड, जेजुरी, इंदापूर, बारामती. सांगली- आष्टा, विटा, तासगाव, इस्लामपूर, पलूस नगरपरिषद (नवनिर्मित), कवठे-महाकाळ न.पं. (नवनिर्मित), कडेगाव न.पं. (नवनिर्मित), खानापूर न.पं. (नवनिर्मित), शिराळा न.पं. (नवनिर्मित). सातारा- वाई, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, कराड, सातारा, महाबळेश्वर गिरीस्थान, पाचगणी गिरीस्थान, कोरेगाव न.पं. (नवनिर्मित), मेढा न.पं. (नवनिर्मित), पाटण न.पं. (नवनिर्मित), वडूज न.पं. (नवनिर्मित), खंडाळा न.पं. (नवनिर्मित), दहिवडी न.पं. (नवनिर्मित). सोलापूर- करमाळा, कुर्डूवाडी, बार्शी, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी. कोल्हापूर- वडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कागल, मुरगुड, गडहिंग्लज, पन्हाळा गिरीस्थान, मलकापूर. नाशिक- सटाणा, नांदगाव, मनमाड, भगूर, सिन्नर, येवला. अहमदनगर- कोपरगाव, शिर्डी न.प., राहता, श्रीरामपूर, राहुरी, देवळी-प्रवरा, संगमनेर, पाथर्डी. धुळे- शिरपूर-वरवडे, दोंडाईचा-वरवडे. नंदूरबार- शहादा. जळगाव- चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, भुसावळ, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, बोदवड न.पं. (नवनिर्मित). औरंगाबाद- कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलाताबाद. जालना- भोकरदन, जालना, अंबड, परतूर. परभणी- मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा, सेलू, जिंतूर. नांदेड- माहूर नगरपंचायत, अर्धापूर नगरपंचायत, उमरी, धर्माबाद, हदगाव, मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली, कंधार, देगलूर, मुखेड. हिंगोली- हिंगोली, कळमनुरी, बसमतनगर. बीड- गेवराई, माजलगाव, बीड, किल्लेधारुर, परळी, आंबेजोगाई. लातूर- निलंगा, उदगीर, औसा, अहमदपूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, नळदुर्ग, मुरुम, उमरगा, परांडा, उस्मानाबाद, तुळजापूर. अमरावती- अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरुड, शेंदुरजना घाट, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर. अकोला- अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, पातूर. बुलढाणा- जळगाव-जामोद, शेगाव, नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, बुलढाणा, देऊळगाव-राजा. वाशीम- कारंजा, वाशीम, मंगरुळपीर. यवतमाळ- यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, घाटंजी, वणी, आर्णी, दारव्हा. नागपूर- नरखेड, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, रामटेक, उमरेड, कामठी, खापा, काटोल. वर्धा- देवळी, आर्वी, सिंदी रेल्वे, पुलगाव, हिंगणघाट, वर्धा. भंडारा- पवनी, भंडारा, तुमसर, साकोली नगरपरिषद (नवनिर्मित). गोंदिया- तिरोरा, गोंदिया. चंद्रपूर- मूल, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, नागभिड नगरपरिषद, (नवनिर्मित) सिंदेवाही न पं (नवनिर्मित) गडचिरोली- देसाईगंज, गडचिरोली.

ओडिशात वीज कोसळून 32 ठार

0

भुवनेश्‍वर ( पीटीआय) – ओडिशातील विविध भागांमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपात्कालीन विभागाने दिली आहे. भद्रक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून सर्वाधिक आठ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, बालासोर येथे सात, खुरदा येथे पाच आणि मयूरभंज जिल्ह्यातील तीन जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. इतर जिल्ह्यांतील काही नागरिकांचाही यात समावेश असल्याचे आपात्कालीन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मृतांच्या नातेवाइकांना मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

नागपुरात वर्षभरात हृदयविकाराने एक हजाराहून अधिक दगावले

0

हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांचे मत

नागपूर- उपराजधानीत प्रत्येक वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने एक हजाराहून जास्त मृत्यू होत असल्याचे वेगवेगळ्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. पैकी काही रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. उपचारादरम्यान होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० ते ७० टक्के रुग्णांचा शहरात ‘इकमो’ उपकरणांची संख्या वाढल्यास जीव वाचणे शक्य आहे. शहरात सध्या केवळ एकच उपकरण आहे, अशी माहिती हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ (सीव्हीटीएस) डॉ. आनंद संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्य भारतातील सर्वाधिक हृदयाशी संबंधित रुग्ण उपचाराकरिता नागपूरला येतात. या रुग्णांना हृदयविराकाचा झटका आल्यास त्यांच्या हृदयासह यकृताचे काम मोठय़ा प्रमाणावर बिघडते. तेव्हा वेळीच या रुग्णांच्या अवयवांना वाचवण्याचे प्रयत्न गरजेचे असतात.
सध्या होणाऱ्या मृत्यूत या अवयवांची गुंतागुंत वाढून होणारे मृत्यू जास्त आहेत. ते नियंत्रणात आणण्याकरिता हल्लीच्या वैद्यकीय उपचार पद्धतीत इकमो उपकरणाला जास्त महत्त्व आहे. या उपकरणाद्वारे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतो. हे उपकरण हृदयाकडे येणाऱ्या रक्ताला शुद्ध करून ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाठवते. या प्रक्रियेने रुग्णाच्या यकृतासह हृदयावरील ताण कमी होऊन ते सुरक्षित राहण्यास मदत होते. गंभीर गटातील रुग्ण या उपकरणावर २१ दिवसापर्यंत राहू शकतो. या काळात डॉक्टरांकडून रुग्णाला तातडीने बरे करण्याकरिता प्रयत्न केले जातात. उपचाराला योग्य प्रतिसाद मिळाल्यास या उपकरणावरून रुग्णाला पुन्हा सामान्य अवस्थेत आणण्यात डॉक्टरांना यश मिळते. मध्य भारतात मोठय़ा संख्येने हृदयरुग्ण असले तरी सध्या हे उपकरण एकाही शासकीय रुग्णालयांत नाही. नागपूरचे न्यू ईरा रुग्णालय वगळता ते इतर खासगी संस्थांमध्येही उपलब्ध नसल्याची माहिती डॉ. संचेती यांनी दिली.
या उपकरणाच्या सहाय्याने रुग्णाला जीवदान मिळते. याचा खर्च जास्त असला तरी शासकीय व इतरही खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ अधिक रुग्णांना शक्य आहे. पत्रकार परिषदेला डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा उपस्थित होते.

सौदीत 10 हजार बेरोजगार भारतीयांची उपासमार

0

– –

नवी दिल्ली (पीटीआय)- नोकरी गेल्याने बेरोजगारी आलेल्या सुमारे दहा हजार भारतीय कामगारांची मागील तीन दिवसांपासून सौदी अरेबियातील जेद्दाह येथे उपासमार सुरू आहे. या कामगारांना मदत करण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे लवकरच सौदीला जाणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली आहे.

बेरोजगार झालेल्या सुमारे 10 हजार भारतीय कामगारांची जेद्दाहमध्ये उपासमार सुरू असल्याचे सांगत याप्रकरणी स्वराज यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती एका व्यक्तीने ट्विट करून केली होती. ही बाब समोर आल्यानंतर परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असे स्वराज यांनी सांगितले. जेद्दाहमधील बेरोजगार कामगारांना अन्न पुरविण्याची व्यवस्था करण्याची सूचना आपण भारताच्या सौदी अरेबियातील दूतावासाला केली असल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले. तसेच स्वराज यांनी सौदीत राहत असलेल्या भारतीय नागरिकांना उपासमार होत असलेल्या नागरिकांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सौदी अरेबिया आणि कुवैत येथील भारतीय कामगार पगार आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. सौदीमध्ये या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे हा मुद्दा कुवैत आणि सौदीतील प्रशासनाकडे उपस्थित करणार आहेत, तर व्ही. के. सिंह हे लवकरच सौदीला जाणार आहेत, असे स्वराज यांनी सांगितले.

आखातात 60 लाख भारतीय
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार बाहरीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या सहा आखाती देशांत सुमारे 60 लाख भारतीय कामगार काम करत असल्याचा अंदाज आहे. भारतातून आखातात बेकायदा प्रवेश करणाऱ्या कामगारांची संख्याही प्रचंड वेगाने वाढते आहे. आखातात काम मिळविण्यासाठी मध्यस्तांना मोठी रक्कम दिली जाते. अनेकदा भारतीय कामगारांना पगाराची खोटी आश्‍वासने दिली जातात.

कंपन्या बंद; पगार नाहीत
कुवैत आणि सौदीतील अनेक कंपन्या बंद झाल्यामुळे अनेक भारतीय कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांना त्यांचे पगारही मिळालेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भारतीय कामगारांना सध्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते आहे. सौदीच्या तुलनेत कुवैतमधील परिस्थिती जरा बरी आहे, असे स्वराज यांनी सांगितले.

सौदी अरेबियातील बेरोजगार कामगारांना मोफत शिधावाटप करण्याची सूचना रियाध येथील भारतीय दूतावासाला केली आहे.
– सुषमा स्वराज, भारताच्या परराष्ट्रमंत्री