31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024
Home Blog Page 5226

लेखणीबंदच्या नावावर कार्यालय सोडून कर्मचारी गेले फिरायला

0

गोंदिया,दि.१८-महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यात १५ जुर्लेपासून लेखणी बंद आंदोलन सुरु करण्यात आले.शेजारील भंडारा जिल्ह्यातही १५ जुर्लेपासून आंदोलनाला सुरवात झाली.पण गोंदियात मात्र १८ जुर्ले रोजी हे आंदोलन सुरु झाले ते सुध्दा भंडारा येथील काही पदाधिकारी आल्यानंतर.लेखणीबंद आंदोलन म्हणजे कार्यालयात आपल्या जागेवर बसायचे आहे,परंतु कुठलेही काम करायचे नाही.परंतु आज जेव्हा गोंदिया जिल्हा परिषदेत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले,त्यानंतर मात्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागासह काही विभागाकडे फेरफटका मारल्यावर विचित्र स्थिती बघावयास मिळाली.आंदोलनातील सहभागी सर्व कर्मचारी वर्ग आपल्या कार्यालयात दिलेल्या आस्थापनेवर बसायला मिळेल असी अपेक्षा होती,परंतु तसे दिसून आले नाही.सामान्य प्रशासन विभागाचेच सांगायचे झाले तर या विभागातील मेश्राम,अशोक केंद्रे,लिचडे,पळसकर,खोटेले,इनवाते आदी कर्मचारी हे कार्यालयातून चक्क नदारद होते.ते कार्यालय सोडून लेखणी बंद आंदोलनाच्या नावावर पंचायत समिती कार्यालयांना भेटी द्यायला गेले होते.जातांना त्यांनी आपल्या वरिष्ठांची परवनागी घेतली होती की नाही प्रश्न सध्या अनुत्तरीत असला तरी लेखणीबंद आंदोलनाच्या नावावर काम न करता पंचायत समितीला भेट द्यायला गेलेल्या कर्मचाèयांवर सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करतात की गप्प राहतात हे सुध्दा बघावे लागणार आहे.त्यातच भंडारा येथील सीईओनी तर चक्क लेखणी बंद आंदोलनात सहभागी कर्मचारी यांना काम नाही तर वेतन नाही असे पत्रच दिले आहे,तसेच पत्र गोंदियाचे सीईओ देतात की काय याकडे लक्ष लागले आहे.

वाढीव विजबिलाच्या विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

0

भंडारा,दि.१८-महाराष्ट्र राज्य विज वितरण कपंनीच्यावतीने वितरीत करण्यात आलेल्या जुर्ले महिन्याच्या विजबिलात अवाढव्य वाढ करुन पाठविलेल्या बिलाचा विरोध करुन भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने आज सोमवारला हल्लाबोल आंदोलन करुन विज बिलाची होळी करण्यात आली.येथील विज वितरण कपंनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करुन शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या.यावेळी प्रदेश महासचिव धनजंय दलाल,राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष मिना कुरजेंकर,शहर अध्यक्ष नितिन तुम्हाने,धनजंय सपकाळ,धनराज साठवणे,ललीता रोकडे,हिरा पांडे,जुमाला बोरकर,जयश्री मेश्राम,नेहा शेंडे,स्विटी फाले,प्रेमा गोस्वामी,कार्तिक घोडीचोरर,कलावती सोनवाने,सुनिल आगलावे,भाग्यश्री भोंगाडे,अंजिरा तुमाने,पुष्पा लेंडे,कोमल कुंभलकर,कांता वैद्य,ज्योती न्यायखोर,,रेखा पाठक,निशा न्यायखोर,कविता पारवे,जयश्री लांजेवार यांच्यासह इतर महिला सहभागी झाल्या होत्या.

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

0

यवतमाळ, दि. १८ – शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात जेवणानंतर खेळणा-या सहावीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने बळी गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यांतर्गत येणाºया अंतरगाव येथे रविवारी दुपारी घडली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढले असून या शाळा प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी एका निरागस बालकाला आपला जीव गमवावा लागला.
आदित्य रवी टेकाम (११) रा. रुंझा (ता.पांढरकवडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवार १७ जुलै रोजी शाळेला सुटी असल्याने दुपारच्या जेवणानंतर सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आश्रमशाळेच्या प्रांगणात खेळत होते.

लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

0

गोंदिया दि.18: चौथ्या वेतन आयोगापासून लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर वेतन तफावतीचा अन्याय होत आहे. यावर शासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज(दि.18) सोमवारपासून लेखनी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यात जिल्ह्यातील सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला व त्यांना आल्या पावली परतावे लागले.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एल.पी.ब्राम्हणकर,सचिव गुणवंत ठाकूर,कोषाध्यक्ष मनोज मानकर,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद शहारे,संघटनेचे मार्गदर्शक संजय बनकर,एच.व्ही.गौतम,मंजुषा चौधरी,एस.के,तिवारी,पी.पी.काळे,सौरभ अग्रवाल,व्ही.आय.बिसेन,एम.जी.पालीवाल,ए.जे.बिसेन,सौ.एस.आर.वंजारी आदीसह सर्व कर्मचारी यांनी जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर नारेबाजी करुन आंदोलनाला सुरवात केली.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी हा बेमुदत लेखनी बंद पुकारण्यात आलेला आहे. लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगापासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तथाफवत निर्माण होत आहे. याबाबत कर्मचारी संघटनेने अनेकदा ग्रामविकास मंत्र्यांकडे कैफियत मांडली. लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणीत सुधारणा करणे, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करणे, लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यसुची निश्चित करून मिळणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांप्रमाणे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सर्व स्तरावर नि:शुल्क शिक्षण सवलत मिळणे, वाहनचालकाप्रमाणे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना अतिकालीक भत्ता मिळणे, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे किमान मुळवेतन मिळणेसाठी अधिसुचनेत सुधारणा करणे, एमपीएससी परीक्षेसाठी ४५ वर्षवयोमर्यादेपर्यंत सवलत मिळणे, जुनीच सेवानिवृत्ती वेतन योजना चालु करावी, आरोग्य केंद्रात सहाय्यक प्रशासन पद तयार करावे, पदविधर लिपीकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी.मात्र, केवळ आश्वासन देवून त्यांना खाली हाताने परतवीले. यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राज्यभर बेमुदत लेखनी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

आश्रमशाळा संस्थाचालकाची इलेक्ट्रानिक्स मिडियाच्या पत्रकारांना मारहाण

0

नागपूर,दि.18- शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या गैरव्यवहाराची बातमी करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर संस्थाचालकांनी आज सोमवारला हल्ला करुन मारहाण केल्याची घटना हिंगणा येथील अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळेत घडला.हिंगणा येथील अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळेत अनेक घोटाळे असल्याच्या तक्रारी होत्या.याच विषयावर बातमी करण्यासाठी महाराष्ट्र १ न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी गजानन उमाटे व कॅमेरामन सौरभ होले,आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते व सुनील लोंढे यांना आज धक्कामुक्की करून मारहाण करण्यात आली तसेच त्यांची गाडी जाळण्याची धमकीही देण्यात आली.या संस्थेत खोटी पटसंख्या दाखवून अनुदान लाटले जात असून अनेक गैरप्रकार सुरु असल्याचेही सांगितले जात होते.या सर्व आरोपांची शहानिशा कऱण्यासाठी संस्थेत गेले असता तेथे संस्थाचालक श्रीकृष्ण मते आणि त्यांच्या मुलांसह काही कर्मचार्‍यांनी पत्रकारांवर हल्ला करीत त्यांना मारहाण केली.
महिला पत्रकारही या मारहाणीतून सुटल्या नाहीत.या सर्व घटनेचे विडीओ रेकॉर्डिंग देखील संबंधित पत्रकारांजवळ आहे.घटनेनंतर पिडीत पत्रकारांनी हिंगणा पोलीस स्टेशन गाठले असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत आहेत.तसेच संस्थाचालक देखील आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत. या घटनेमुळे प्रसार माध्यमामध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपी संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आंबेडकरी संघटनांतर्फे आंबेडकर भवन पाडणाऱ्यांचा निषेध

0

गडचिरोली,दि.१८: २५ जून च्या मध्यरात्री रत्नाकर गायकवाड व सहकाऱ्यांच्या इशाऱ्यावर मुंबईतील दादरस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे ऐतिहासिक केंद्र पाडण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी काल गडचिरोलीत विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन सरकार व प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.
इंदिरा गांधी चौकात झालेल्या या सभेला बहुजन युवा मंचचे डॉ कैलाश नगराळे, प्रा. पंडित फुलझले, दर्शना मेश्राम, प्रणिता रायपुरे, कवी प्रभू राजगडकर, अखिल भारतीय आदिवासी महासभेचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल येरमे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ महेश कोपुलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.पी.शेंडे अध्यक्षस्थानी होते.

काँग्रेस म्हणाली- 90 च्या दशकातही अशी स्थिती नव्हती

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. काँग्रेसने राज्यसभेत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशी स्थिती तर 1990 मध्ये देखील नव्हती. दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र काश्मीरमध्ये सामान्यांना लक्ष्य केले जात आहे.
जीएसटीवर नजरा
सरकारचा प्रयत्न आहे की या अधिवेसनात वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक कोणत्याही परिस्थितीत सर्व संमतीने मंजूर केले जाईल. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीसंबंधीचा घटनाक्रम, काश्मीरमधील हिंसाचार महागाईच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पुन्हा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. सगळ्यांचा मूड चांगला आहे, आशा आहे की अधिवेशनातही चांगले निर्णय होतील. देशाला नवी दिशा देण्याचे काम संसदेच्या या अधिवेशनात होईल.’

राज्यात अशी घटना घडणे शरमेची गोष्ट-पवार

0

मुंबई – मुंबई – दिल्लीतील निर्भयासारखी बलात्कार व हत्येची घटना राज्यात घडणे ही शरमेची गोष्ट आहे. कोणत्याही नराधमाची बलात्कार करण्याची हिंमत होणार नाही, असा कायदा राज्यात करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.
राज्यातील आया-बहिणीकडे वाकडी नजर टाकायची कोणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे, अशी दहशत निर्माण करणारा कायदा करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणावरील चर्चेने सुरुवात झाली. विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणून कोपर्डी येथील बलात्कारावर चर्चेची मागणी केली आहे.

13 जुलै रोजी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी जनक्षोभ उसळला आहे. याचे पडसाद विधानमंडळातही पडले. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी हा गंभीर मुद्दा असून स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा व्हायलाय हवी अशी भूमिका घेतली.

मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी याबाबत निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी चांगलेच रान पेटवले. केवळ निवेदन देऊन संपवण्यासारखा हा विषय नसून चर्चा करुन कठोर कायदा व्हायला हवा, अशा शब्दात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.

विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव
विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी स्थगन प्रस्ताव सादर केला.

नवज्योत सिंग सिद्धूचा भाजपाला रामराम

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १८ – माजी कसोटी क्रिकेटपटू व भाजपाचे राज्यसभेतील खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी खासदारपदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम केला आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील एक्झिटमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपामधून बाहेर पडल्यानंतर सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान सिद्धू यांच्या पत्नीही आमदारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

आण्णाभाऊ साठे लोकशाहिर व् समाजसुधारक

0

स्मृतिदिन – १८ जुलै १९६९

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील आगळं-वेगळं साहित्यसंचित आहे. लावण्या, पोवाडा, वगनाट्याद्वारे त्यांनी जनजागृतीचे काम केले. १ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णा शाळेत फक्त दोनच दिवस गेले. बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीतच झाले. आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.
वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक’ हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन, `जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव’ प्रसिध्द झाले तर `फकिरा’ ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्‍या माणसाचे साहित्य जीवन त्यांनी समाजासमोर उभे केले. फकिरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भुताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. समाजाचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून त्यांनी मान्यता मिळविली.
अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्‍या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. अण्णाभाऊ माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट’ होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले.
फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात. `द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।`
आजच्या काळातही ही लावणी उपयोगीच ठरते. त्यांचे `इनामदार` हे नाटक त्यात खेड्यातील `सावकारी पाश’ शेतकर्‍यांभोवती कसे आवळले जातात. आणि गुन्हेगारीला प्रवृत्त होतात याचं चित्र स्पष्ट करते. आजही शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्येच्या वेळी हे नाटक आठवून जाते. पण हे नाटक मराठीत फारसं चाललं नाही. हिंदी रुपांतर मात्र लोकांना भावले.
अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा’ ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल’ साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्‍या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असा हा पददलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात जन्मला होता.