37.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 6483

सेवा दिरंगाई भोवणार

0

मुंबई- नागरिकांना विशिष्ट मुदतीत सरकारी सेवा देण्यात कुचराई केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असलेला कायदा तयार केला जात आहे.
राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या व दप्तरदिरंगाईला प्रतिबंध घालणारा कायदा केला खरा. परंतु त्याच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा करण्याची त्यात तरतूद नव्हती. त्यामुळे या कायद्याचा सरकारी यंत्रणेवर कोणताही वचक नव्हता. ही उणीव नव्या सरकारच्या प्रस्तावित सेवा हमी कायद्याद्वारे दूर केली जाणार आहे.
राज्यात नवे सरकार आल्यानंतर स्वच्छ, पारदर्शक कारभाराबरोबरच नागरिकांना विशिष्ट कालावधीत सेवा मिळालीच पाहिजे, यासाठी सेवा हमी कायद्याची घोषणा केली. लगेच मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली १३ सचिवांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. ज्या ज्या राज्यांमध्ये सेवा हमी कायदा आहे, त्याचा अभ्यास करुन राज्यात कशा प्रकारे कायदा करावा, याचा अहवाल महिनाभरात देण्यास या समितीला सांगण्यात आले आहे.
प्रस्ताव असे असतील
*राज्य सरकारला कोणकोणत्या सेवा व त्या पुरवणारे अधिकारी कोण हे अधिसूचित करावे लागेल.
*त्यानंतर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याने त्याची जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी प्रत्येक विभागात व कार्यालयात प्रथम अपील अधिकारी असेल.
*पहिल्या अपील अधिकाऱ्याकडून न्याय मिळाला नाही, तर द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याची तरतूद असेल. अपील अधिकाऱ्याला कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील.

काळया पैशाच्या तपशिलाबाबत भारतालाही मदत करण्यास इच्छुक

0

काळ्या पैशाबद्दल मूळ तपशिलाच्या एक टक्कादेखील माहिती भारताकडे नाही. मी इतर काही देशांना याबाबत मदत करीत असून, भारतालाही मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे ‘एचएसबीसी’चे माजी अधिकारी हर्वे फल्चियानी यांनी सांगितले.
पॅरिस- काळ्या पैशाबद्दल मूळ तपशिलाच्या एक टक्कादेखील माहिती भारताकडे नाही. मी इतर काही देशांना याबाबत मदत करीत असून, भारतालाही मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे ‘एचएसबीसी’चे माजी अधिकारी हर्वे फल्चियानी यांनी सांगितले.
फ्रान्समधून एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हर्वे यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, ‘जीनिव्हातील एचएसबीसीमध्ये गुप्त खाती असलेल्या हजारो जणांची यादी आठ वर्षापूर्वी जाहीर केली होती. त्यामध्ये ६०० भारतीयांची नावे होती. फ्रान्स सरकारने एचएसबीसीमध्ये बँक खाती असलेल्या भारतीयांच्या नावांची यादी २०११ मध्ये भारत सरकारला दिली होती. हे फक्त हिमनगाचे टोक आहे. याबाबत भारताने उद्या मदत मागितली तर आम्ही उद्याच प्रस्ताव देऊ, असेही ते म्हणाले.
हर्वे हे जिनिव्हास्थित एचएसबीसीमध्ये सिस्टम इंजिनीअर म्हणून काम करत होते. त्यांनी स्विस बँकांच्या इतिहासातील सुरक्षेचे सर्वात मोठे उल्लंघन करून एक लाख २७ हजार खात्यांची माहिती मिळवून ती २००८ मध्ये फ्रान्स सरकारला दिली होती. सुरुवातीला फरार झालेले, नंतर तुरुंगात गेलेले ४२ वर्षीय हर्वे आता अमेरिका, स्पेन, फ्रान्स आणि बेल्जियम आदी देशांना करचुकवेगिरी, सावकारी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत करीत आहेत.

प्रजासत्ताक दिनासाठी ओबामांना निमंत्रण

0

नवी दिल्ली- भारताच्या २०१५ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसने दिली. भारताने दिलेले आमंत्रण ओबामा यांनी स्वीकारले आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ओबामा हे भारतात येणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रण दिले होते. याची माहिती खुद्द मोदींनी आपल्या ट्विटरवरून माहिती ही दिली होती.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास येणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष ठरले आहेत.

‘बहुसंख्याकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज नाही’-केंद्रसरकार

0

वृत्तसंस्था
लखनौ-अल्पसंख्य समाजाच्या धर्तीवर बहुसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.२१) अलाहाबाद हायकोर्टात स्पष्ट केले.उत्तरप्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नूतन ठाकूर यांनी बहुसंख्य समाजासाठीही मंत्रालय स्थापण्याची मागणी संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने ही भूमिका मांडली. हिंदू समाजाबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या स्थापनेमुळे हिंदूंबाबत भेदभाव होत नाही. अल्पसंख्य समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटनेतील कलम २९ प्रमाणे अल्पसंख्याक मंत्रालय स्थापन केल्याचेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे केंद्रसरकारने बहुसंख्याक(ओबीसी)समाजाला हिंदू समाज उल्लेखीत करुन या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालया स्थापण्यास हायकोर्टात दिल्याने भविष्यात या समाजाला विविध योजनापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.

अदानींच्या कर्जावरून मोदींवर आरोप

0

वृत्तसंस्था,
नवी दिल्ली-अदानी समुहाचे मालक व उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योगसमुहाला ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीसाठी एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावरून वादाला तोंड फुटले उठले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे कर्ज बेकायदा देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच, या प्रकरणी फक्त समझोता करार झाला असून, योग्य छाननी व कारवाईनंतरच कर्जाची रक्कम अदा केली जाणार असल्याचे स्टेट बँकेने स्पष्ट केले.
मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच अदानी यांच्या या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिल्याचे क्वीन्सलँड या ऑस्ट्रेलियन प्रांतांच्या प्रमुखांनी जाहीर केले होते. मोदींच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात स्वतः अदानी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य सहभागी झाल्या होत्या. त्यावरून, ‘स्टेट बँकेने अदानी यांना कर्ज देण्याचा निर्णय नेमक्या कोणत्या औचित्याने घेतला? पंतप्रधानांच्या भेटीवेळी त्यांच्यासमोर नेमके कोण बसले होते, असे प्रश्न काँग्रेस नेते अजय माखन यांनी केला आहे.

संस्कृत सक्तीचे करा

0

नवी दिल्ली-सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमातून जर्मन भाषा वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बळ मिळालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता संस्कृतसाठी दंड थोपटले आहेत. केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसई) शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न ‘संस्कृत भारती’ या संघटनेने केली आहे.जेव्हापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तेव्हापासूनच शिक्षणात बदल होण्यास सुरवात झाल्याने भविष्यात संघप्रणित इतिहासाचे वचर्स्व राहणार आहे.
‘संस्कृत भाषा ही भारताची ओळख आहे. संस्कृत भाषा येत नसलेला किंवा माहीत नसलेला स्वत:ला भारतीय कसा म्हणवून घेऊ शकतो,’ असा सवाल संस्कृत भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश कामत यांनी केला आहे. सीबीएसई बोर्डाने शाळा वा कॉलेजांमध्ये तिसऱ्या भाषेचा पर्यायामध्ये परदेशी भाषांना स्थान द्यायचे थांबवायला हवे. अन्यथा आंदोलन केले जाईल,’ असा इशाराही कामत यांनी दिला.
‘स्वातंत्र्यापासूनच्या प्रत्येक सरकारने संस्कृत भाषा संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले आहे. खरंतर संस्कृत ही इंडो-युरोपियन भाषांची जननी आहे. पण ही मूळ भाषाच आता मागे पडली आहे. तिच्याऐवजी पर्शियन आणि ऊर्दू भाषेतील शब्द रोजच्या वापरात आले आहेत. त्यांची गरज काय, असा सवाल कामत यांनी केला

संजय राऊत यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू

0

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू मिळाला आहे. शिवसेनेने शुक्रवारी नव्या पक्ष प्रवक्त्यांची नावे जाहीर केली.

जुन्या प्रवक्त्यांमधील निलम गो-हेंचा अपवाद वगळता पक्ष प्रवक्तेपदी नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. मनोहर जोशी, सुभाष देसाई या ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांच्या जागी अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, विजय शिवतारे आणि डॉ. मनिषा कायंदे यांची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय राऊत यांना प्रवक्तेपदावरुन हटवण्या मागचे नेमके कारण पक्षाने स्पष्ट केले नसले तरी, संजय राऊत यांच्या विधानांनी अनेकदा शिवसेनेच्या अडचणी वाढवल्या आहेत तसेच शिवसेनेची नेमकी भूमिका कुठली असा प्रश्नही निर्माण केला होता. त्यामुळे त्यांना पक्ष प्रवक्तेपदावरुन दूर केल्याची चर्चा आहे.

पक्ष प्रवक्ते हे पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडत असतात तसेच विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांच्या कार्यक्रमांमध्येही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता सहभागी होऊन पक्षाची बाजू मांडतो.

नागपूरात वेदचे विकास धोरणावर चर्चासत्र

0

नागपूर : विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) आयोजित केलेल्या ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या विषयावर रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. गडकरी छोट्या राज्याचे पुरस्कर्ते आहेत तर चव्हाण हे मागास भागाच्या विकासावर अधिक भर देण्याची भूमिका मांडणारे आहेत. शिवाय विधानसभा निवडणूक काळात गडकरींनी चव्हाण यांच्यावर नेम साधला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एका व्यासपीठावर येऊन आपली बाजू कशी भक्कमपणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चर्चासत्रात राजदीप सरदेसाई हे नियंत्रकाची भूमिका बजावतील. पारंपरिक राजकीय विचारधारा बाजूला सारून विकासाच्या मुद्यांवर राजकीय नेते एकत्र आले पाहिजे, अशी वेदची नेहमीचीच भूमिका आहे. जात, धर्म, क्षेत्र आणि भाषावाद बाजूला सारून मतदारांनी मतदान केले. विदर्भ विकासाच्या दृष्टीने लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे नेत्यांनी समजावून घ्यावे, असे वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख आणि सचिव राहुल उपगन्लावार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

शिवस्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन

0

मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या चार महिन्यांत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. या स्मारकासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक परवानगी लवकरच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विशेष म्हणजे या स्मारकासाठी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पुढाकार घेतला होता.परंतु केंद्रात त्यांचेच सरकार राहून पर्यावरणाची परवानगी मिळू न शकल्याने त्याचे काम होऊ शकले नव्हते.तसेच बांधकामाच्या काढलेल्या टेंडरलाही प्रतिसाद मिळालेला नव्हता.आता त्यामुळे या आंतरराष्ट्रीय दजार्च शिवाजी स्मारकाच्या भूमिपुजनाचे काम भाजप सरकारच्या काळात होऊन ते पुणर् होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले पाहिजे. यासाठी ज्या विभागांच्या मंजुरींची आवश्यकता आहे, त्या तातडीने आणि वेळेची मर्यादा पाळून पूर्ण केल्या पाहिजेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या स्मारकाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर स्मारकाच्या निर्मितीसाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जगात अशा प्रकारचे स्मारक ज्या कंपन्यांनी उभारले आहे, त्यांचे देखील मार्गदर्शन यासाठी घेण्यात यावे, या सर्व तांत्रिक बाबी येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करून पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जे. जे. स्कूल आॅफ आर्टने स्मारकाचे संकल्पचित्र तयार केले आहे. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हे स्मारक अरबी समुद्रातील भव्य अशा खडकावर उभारणार असून ते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर, तर मरीन ड्राईव्हपासून साडेतीन किलोमीटर आणि गेट वे आॅफ इंडियापासून साधारणत: १० ते १२ किलोमीटरवर असेल.

खासदारांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक विचार करणार-फडणवीस

0

मुंबई – केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या प्रश्नांवर “सह्याद्री‘ अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक पाठपुरावा करण्याचे ठरले.यावेऴी आम्ही शासनाच्या विविध विभागांना मागणी, सूचनांची पत्रे देतो पण त्यांचे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, अशी तक्रार राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर, खासदारांच्या पत्रावर काय कार्यवाही शासनाने केली हे त्यांना दोन महिन्यांच्या आत कळविले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
या बैठकीस लोकसभा आणि राज्यसभेतील राज्याचे खासदार उपस्थित होते. बैठकीस केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार शरद पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या खासदारांची उपस्थिती होती. या खासदारांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. ब्रिमस्टोवॅड, अपारंपरिक ऊर्जा, मुंबई उपनगर रेल्वेशी संबंधित प्रश्न, मुंबई विकास योजनेत केंद्राचा निधी मिळणे, परवडणारी घरे, मराठवाड्यातील दुष्काळ, कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडणे, अतिरिक्त दुधाचा प्रश्न, कापूस हमी भाव, मेट्रोचे जाळे, आरोग्य यंत्रणा, इंदू मिल जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक अशी विविध विषयांवर चर्चा होऊन केंद्राकडे याचा पाठपुरावा सातत्याने करण्याचे ठरले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे, कोस्टल रोड अशा प्रश्नांवरही चर्चा झाली.
खासदारांच्या विभागनिहाय बैठका
राज्यातील खासदारांच्या मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न लक्षात घेता खासदारांच्या विभागनिहाय बैठका घ्याव्यात, अशी काही खासदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्याचप्रमाणे खासदारांच्या आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या पत्रांना तातडीने उत्तरे गेली पाहिजेत, असे निर्देश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.