गोंदिया,दि.८ : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्व दयावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पुर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी असे आवाहन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
८ सप्टेबर रोजी आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशिलाबाई सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सिताबाई पाथोडे, उपसरपंच श्री.किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी घोषे, केंद्रप्रमुखरामटेके, रुम टू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर,पोलीस निरिक्षक श्री.सांडभोर उपस्थित होते.
श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते असेही मेंढे यावेळी म्हणाल्या.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात ५० ते ६० वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.सुशिलाबाई सूर्यवंशी बोलतांना म्हणाल्या, धनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खुप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमीत घ्यावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या.
तहसिल कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार, देशमुख, शाळेतील शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेवून यशाची शिखरे गाठावी- उषा मेंढे
दोन चंदन तस्कराकडून अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत
berartimes.com
गोंदिया,दि.8:- गोंदिया वनविभागाच्या चमूने आज गुरुवारला महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील रजेगावजवळील वाघनदीला लागून असलेल्या कोरणी गावाजवळ दुचाकीमोटारसायकलने चंदनाची तस्करी करणार्या दोघांना वाहनासह ताब्यात घेतले.वनपरिक्षेत्राधिकारी अजय मेश्राम व क्षेत्रसहाय्यक अरुण साबडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाचे गस्तपथक हे कोरणीगावाजवळ सकाळपासूनच या तस्कराच्यामागावर होते.ते मध्यप्रदेशातून कोरणीत येताच त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 61 किलो चंदनाच्या काड्या आढळून आल्या. मोहमद फैय्याज अंसारी(वय 44,रा.हाजिगंज जि.कनोज,उत्तरप्रदेश) व रामगोपाल बनकर रा.बगडमारा ता.किरनापूर,जि.बालाघाट असे पकडलेल्या चंदनतस्कराचे नाव आहे.
पकडण्यात आलेल्या चंदनाची किमत २ लाख रुपये असून ५० हजार किमतीची दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय मुख्य आरोपी मोहंमद सययद नागपुरातील रहिवाशी असून तो अतर विक्रीचा व्यवसाय करतो.त्याच्याकडेच हा चंदन चालला होता.आरोपीकडून विचारपूस केल्यानंतर त्यांना सोबत घेऊन वनविभागाचे पथकाने नागपूर गाठून मुख्य आरोपी असलेल्या मोहम्मद सय्यद याच्या घराची तपासणी सुरु केली आहे.मोह्हमद सय्यद चंदन नागपूरातून उत्तरप्रदेशात पाठविण्याची व्यवस्था करायचा अशी माहिती वनविभागाच्या हाती आली असून गोंदिया स्थानिकमध्ये कुणाशी संबध आहेत काय याचाही तपास वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
पाचहजाराची लाच स्विकारतांना तात्रिंक अधिकारी जाळ्यात
berartimes.com
आमगाव,दि.8- येथील पंचायत समितीच्या कृषी विभागात कार्यरत तांत्रिक अधिकारी भक्तप्रसाद राऊत याला पाच हजार रुपयाची लाच स्विकारतांना आज (दि.8) रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या भातखाचराच्या जून 2016 पर्यंतच्या कामाचे 28 हजार रुपयाचे बील काढून देण्याकरीता तांत्रिक अधिकारी राऊत यांनी सहा हजार रुपयाची मागणी केली होती.परंतु अर्जदाराला लाच देण्याची मूळीच ईच्छा नसल्याने त्यांने लाचलुचपत प्रतिंबधक विभागाकडे 6 सप्टेंबरला तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून राऊत याला पाच हजार रुपये स्विकारतांना अटक केली आहे.पोलीस स्टेशन आमगाव येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.एसीबीचे पोलीस अधिक्षक संजय दराडे,अपर पोलीस अधिक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई गोंदिया येथील एसीबीच्या चमू ने केली आहे.
साकोली काँग्रेसचे एसडीओला निवेदन
berartimes.com साकोली,दि.8- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रोटेक्शन अॅण्ड इंटरनल शिक्युरीटी अॅक्टच्या संदर्भात साकोली तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.त्याचप्रमाणे सदर अॅक्ट रद्द करण्यात यावे यामागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फेत महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात आज गुरुवारी पाठविण्यात आले.या अॅक्ट मुळे सामान्य मानसाला एखादा घरगुती कार्यक्रम घ्यायचा असेल बारसा,साखरपुडा, कुणाच्या घरी मय्यत (अंत्यसंस्कार) ईत्यादि ईत्यादी आणी या कार्यक्रमामध्ये 100 पेक्षा जास्त लोकं एकत्र येत असतील तर पोलीस परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही. तसेच या कार्यक्रमात सिसिटिव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहिल.म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या घरी मय्यत झाल्यास अंत्यसंस्कार करायचे असल्यास दुखः विसरून आधी पोलीसाची परवानगी घ्यायची हि सरकारची हिटलरशाही खपवून घेणार नाही.त्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर,अजयराव तुमसरे, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशीने, जेष्ठ नेते मधुकरजी लिचडे होमराजभाऊ कापगते उपस्थित होते.
नागपुरातील बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र शासन देणार 100 कोटी- डॉ. महेश शर्मा
नवी दिल्ली, 8 : दिक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या
भागांना जोडणारा नागपुरात प्रस्तावीत असलेल्या बुध्दिस्ट सर्कीटसाठी
केंद्र शासनाच्या ‘स्वदेश दर्शन योजने’तून 100 कोटींचा निधी देण्यात
येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा
यांनी दिली.
परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी
मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुध्दिस्ट सर्कीट संदर्भात
बैठक झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे
पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह केंद्र व
राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकरी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर केलेले
नागपुरातील दिक्षा भूमी हे ठिकाण, जपानीस्थापत्य शैलीवर आधारीत
नागपुर-कामठी मार्गावरील ड्रॅगन पॅलेस आणि नागपूर परिसरातील डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिंचोली यांना
जोडण्यासाठी बुध्दीस्ट सर्कीट उभारण्यात येणार आहे. नागपुरात
देश-विदेशातून येणारे पर्यटक व बुध्द धर्माचे अनुयायी यांना दिक्षा भूमी,
ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला सुलभरित्या भेट देता यावी यासाठी ही योजना
तयार करण्यात आली आहे. बुध्दीस्ट सर्कीटसाठी राज्य सरकार आर्थिक मदत
करणार असून केंद्र शासनानेही या प्रकल्पास मदत करावी अशी मागणी यावेळी
राज्यशासनाच्यावतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत डॉ. महेश शर्मा
यांनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत बुध्दिस्ट
सर्कीटसाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दि. 21 ते 23 सप्टेंबर
2016 दरम्यान आयोजित करण्यात येणा-या ‘अतुल्य भारत गुंतवणूक परिषदेत’
महाराष्ट्र शासनाच्यावतीने बुध्दिस्ट सर्कीटबाबत मांडणी करावी.त्यामुळे
परदेशी कंपन्यांकडूनही आर्थिक मदत मिळेल अशी सूचनाही डॉ. महेश शर्मा
यांनी यावेळी केली.
शाळांमध्ये वाचन-आनंद उपक्रमात विद्यार्थांचा सहभाग
गोंदिया,दि.8- राज्य शासनाने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबर २0१६ रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याच्या निर्णय घेतला आहे.त्याची पूर्वतयारी व राज्यासाठी एक पथदश्री प्रकल्प म्हणून शिक्षण विभागातर्फे आज ८ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून वाचन-आनंद दिवस (दफ्तरविरहित दिवस) जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमाला चांगला प्रतिसाद शाळांनी दिला.पंचायत समिती सभापतीपासून केंद्रप्रमुख आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन उपक्रमाची माहिती घेतली.गोरेगाव तालु्क्यातील मोहगाव(बु.)येथील परशुराम विद्यालयातही केंद्रप्रमुख भगत यांच्या उपस्थितीत वाचन-आनंद दिवस साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लू.कटरे,सहाय्यक शिक्षक डी.डी.चौरागडे,पी.एम.चुटे,कु.भारती बिसेन(कटरे),बी.सी.गजभिये,टि.एफ.इळपाचे,व्ही.एस.मेश्राम,एल.वाय.पटले,पी.व्ही.पारधी,मुन्ना पारधी,दिनेश बोपचे विद्यार्थी उपस्थित होते.शाळेतील सुमारे 200 विद्यार्थांनी यात सहभाग घेतला.प्रत्येकांने 10 पुस्तकाच्या जवळपास वाचन केले आहे.एका पुस्तकातील 16 पानाचे वाचन म्हणजे 1 पुस्तक असा नियम शिक्षण विभागाने तयार करुन दिला होता.यावेळी केंद्रप्रमुख भगत यांनी विद्यार्थांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी मिळून अर्धे अर्धे पुस्तके घेऊन आल्यास ओझे कमी होईल असे सांगितले.
जिल्ह्यातील २ लाख ६0 हजार विद्यार्थी प्रती विद्यार्थी किमान १0 पुस्तके या प्रमाणे २६ लक्ष पुस्तकांचे वाचन करतील असे नियोजन करण्यात आले होते. कोणीही विद्यार्थी शाळेत दफ्तर घेऊन येणार नाही. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना चित्रमय पुस्तके पुरविण्यात आली होती. शाळेत पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. गोंदिया तालुक्यातील उच्चप्राथमिक जिल्हा परिषद शाळा पांढराबोडी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंगपूरा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरारटोला येथेही वाचन आनंद दिवस अंतर्गत विद्यार्थीनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले.
महिला व बालकल्याण सभापतींने म्हटले जि.प.सदस्याला ”गेटआऊट”
सभेत प्रश्न विचारणाèया राष्ट्रवादीच्या महिला सभासदांना अपमानित करून सभागृहाबाहेर हाकलले
गोंदिया,दि.8- गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आज गुरुवारला तहकुब मासिक सभेत राष्ट्रवादीच्या महिला सदस्याने सभेच्या आयोजनावरून मुद्दा उपस्थित केल्याचा राग म्हणून सभापती विमल नागपुरे यांनी त्या सदस्याला सभागृहाबाहेर हाकलले. परिणामी, राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार केल्याने जि.प. अध्यक्ष यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नसुद्धा नागपुरे यांनी धुडकावून लावल्याने जि.प. परिसरात तणावाचे वातावरण पसरले.तर महिला बालकल्याण सभापती यांनी आपण असे बोललो नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
सविस्तर असे की, जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाची मासिक सभा गेल्या २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. ती सभा जन्माष्टमीनिमित्ताने वेळेवर तहकूब करण्यात आली.ती तहकुब सभा ही सात दिवसांच्या आत आयोजित करणे नियमान्वये आवश्यक होते. मात्र, सभापतींनी आपल्या प्रभावाचा गैरवापर करून ही सभा आज दि. ८ रोजी दुपारी 1 वाजता आयोजित केली होती. सदस्यांना दिलेल्या नोटीसमध्येही सभेची वेळ १ वाजता असल्याची माहिती जि.प.सदस्य खुशबू टेंभरे,ललीचा चौरागडे व सुनिता मडावी यांनी बेरार टाईम्सला दिली.परंतु, सभेची वेळ बदलवून वेळेवर सकाळी 11 वाजताची करुन सदस्यांना फोन करून सदर सभेची वेळ बदलून ११ ठेवल्याचे सांगण्यात आले.या प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादीच्या कुडवा जि.प. क्षेत्राच्या सदस्या खुशबू टेंभरे यांनी सभेचे सदस्य सचिव असलेले महिला बालविकास अधिकारी अंबादे यांना सभेची वेळ का बदलली असा प्रश्न विचारताच सभापती श्रीमती नागपुरे या श्रीमती टेंभरे यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तुम्हाला काहीही विचारण्याचा अधिकार नाही,सभेला सुरवात करा आणि अधिकार्यांना सुध्दा तुम्हाला काही सांगायची गरज नाही असे म्हणत आपणास गेट आऊट म्हटल्याचे श्रीमती टेंभरे यांनी सांगितले. अधिकारी,कर्मचारी व समिती सदस्यांसमोर अपमानास्पद भाषेचा वापर करुन आपणास अपमानित करीत अधिकाराचा हनन केल्याची तक्रार विभागीय आयुक्तांना लेखी स्वरुपात पाठविली.त्या अगोदर राष्ट्रवादी काँँग्रेसच्या महिला सदस्यानी महिला बालकल्याण समितीच्या सभेचा बहिष्कार करीत जि.प.अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे यांचे कार्यालय गाठले.त्यावेळी खुशबू टेंभरे,ललीता चौरागडे,सुनिता मडावी व वीणा बिसेन यांनी जि.प अध्यक्षांना झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.यावेळी काँग्रेसचे काही जि.प.सदस्यही उपस्थित होते.
त्यामुळे अध्यक्षांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती यांच्याकक्षाकडे स्वत जाऊन झालेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.परंतु, सभापती त्यांचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे समोर आले.अध्यक्षांनाच सभापतींनी सदर सदस्या या बैठकीसाठी बनूनठणून आल्याचे सांगितल्याचे श्रीमती टेंभरे यांनी सांगितले.अध्यक्ष श्रीमती मेंढे यांनी मात्र प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न केले,परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनीही समाधानकारक मार्ग काढण्याबाबत सदस्यांची अध्यक्षांच्या कक्षात चर्चा केली. उल्लेखनीय म्हणजे विरोधी पक्षाचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांचाही एका साधारण सभेत नागपुरे यांनी एकदा पाणउतारा केल्याचे स्वत परशुरामकर यांनी बेरारटाईम्सला सांगितले.राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य कुंदन कटारे यांनीही सदर प्रकरण योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. प्राप्त माहितीनुसार, महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल व अलमारी खरेदी प्रकरणात सभापतींचे नातेवाइकांच्या असलेल्या हितसंबंधीविषयी सर्व सदस्यांत नाराजीचा सूर असल्याचे बोलले जाते. त्याचा राग सभापतीनी राष्ट्रवादीच्या सदस्यांवर काढल्याची चर्चा आहे.
गोंदिया जिल्हा बँकेच्या व्यवहाराची चौकशी करा
हायकोर्टाचा आदेश : विभागीय सहनिबंधकांकडे जबाबदारी
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आर्थिक अफरातफरीच्या आरोपाची दखल घेऊन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहाराची तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश नागपूर विभागीय सहनिबंधक (लेखा) यांना दिला आहे. चौकशीत गैरप्रकार आढळून आल्यास दोषी व्यक्तींवर योग्य कारवाई होण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे अहवाल सादर करावा असे सहनिबंधकांना सांगण्यात आले आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा आदेश देऊन संबंधित जनहित याचिका निकाली काढली आहे. यासंदर्भात महेशकुमार अग्रवाल व जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी याचिका दाखल केली होती. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली.बँकेच्या मुख्यालयासाठी जमीन खरेदी करण्यास मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी १७ ऑगस्ट २00९ रोजी हिरवी झेंडी दाखविली. यानंतर अर्जुनी मोरगाव येथील गंगादेवी अग्रवाल यांची जमीन २ कोटी २ लाख ५0 हजार रुपयांत खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यावेळच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत केवळ २१ लाख २१ हजार रुपये होती. असे असताना अधिक किंमत मोजून जमीन खरेदी करण्यात आली. या व्यवहारात १ कोटी ९४ लाख रुपयांची अफरातफर झाली. यासंदर्भात २५ जून २0१४ रोजी सहकार विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. विभागीय सहनिबंधकांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
केजरीवालांना महिलांनी दाखविल्या बांगड्या
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री व अरविंद केजरीवाल यांना आज (गुरुवार) सकाळी दिल्ली रेल्वे स्थानकावर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घेराव करण्याचा प्रयत्न करत बांगड्या दाखविल्या. केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दिल्लीतील मंत्री संदीप कुमार हे सेक्स व्हिडिओ क्लिपमध्ये दिसल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. चार दिवसांसाठी पंजाब दौऱ्यासाठी केजरीवाल रवाना होत असताना, महिलांकडून आंदोलन करण्यात आले. केजरीवाल हाय हाय, अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या.
महिलांनी केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. या आंदोलनानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य का करता?- हायकोर्ट
नागपूर, दि. 8 – एक याचिकाकर्ता वारंवार केवळ हिंदू धर्माशी संबंधित गोष्टींनाच विरोध करीत असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमचा उद्देश प्रामाणिक आहे तर, तुम्ही केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य का करता, इतर धर्मांतील गोष्टींना विरोध का करीत नाही, असा सवाल न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्याला विचारला. याचे समाधानकारक उत्तर याचिकाकर्त्याला देता आले नाही.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. भारताचा सर्वधर्मसमभाव व माणवतेवर विश्वास आहे. येथील प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या धर्मासह इतरांच्या धर्मांचाही आदर केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला स्वत:च्या धार्मिक परंपरा व प्रथेचे पालन करण्याचे आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अशा परिस्थितीत केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य करण्यात काहीच तथ्य दिसून येत नाही असे मौखिक मत न्यायालयाने नोंदविले.
जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दिलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. शासनाने घोषणेचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव – बेटी पढाव, दारुबंदी व जल संवर्धन ही स्पर्धेची थीम आहे. विभागीय स्तरावर २ लाख, १ लाख ५० हजार व १ लाख रुपये, जिल्हास्तरावर १ लाख, ७५ हजार व ५० हजार रुपये तर, तालुकास्तरावर २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने २७ जुलै २०१६ रोजी जीआर जारी केला आहे. या निर्णयावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता.