महिला व बालकल्याण सभापतींने म्हटले जि.प.सदस्याला ”गेटआऊट”

0
21

सभेत प्रश्न विचारणाèया राष्ट्रवादीच्या महिला सभासदांना अपमानित करून सभागृहाबाहेर हाकलले

गोंदिया,दि.8- गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आज गुरुवारला तहकुब मासिक सभेत राष्ट्रवादीच्या महिला सदस्याने सभेच्या आयोजनावरून मुद्दा उपस्थित केल्याचा राग म्हणून सभापती विमल नागपुरे यांनी त्या सदस्याला सभागृहाबाहेर हाकलले. परिणामी, राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार केल्याने जि.प. अध्यक्ष यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नसुद्धा नागपुरे यांनी धुडकावून लावल्याने जि.प. परिसरात तणावाचे वातावरण पसरले.तर महिला बालकल्याण सभापती यांनी आपण असे बोललो नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
सविस्तर असे की, जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाची मासिक सभा गेल्या २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. ती सभा जन्माष्टमीनिमित्ताने वेळेवर तहकूब करण्यात आली.ती तहकुब सभा ही सात दिवसांच्या आत आयोजित करणे नियमान्वये आवश्यक होते. मात्र, सभापतींनी आपल्या प्रभावाचा गैरवापर करून ही सभा आज दि. ८ रोजी दुपारी 1 वाजता आयोजित केली होती. सदस्यांना दिलेल्या नोटीसमध्येही सभेची वेळ १ वाजता असल्याची माहिती जि.प.सदस्य खुशबू टेंभरे,ललीचा चौरागडे व सुनिता मडावी यांनी बेरार टाईम्सला दिली.परंतु, सभेची वेळ बदलवून वेळेवर सकाळी 11 वाजताची करुन सदस्यांना फोन करून सदर सभेची वेळ बदलून ११ ठेवल्याचे सांगण्यात आले.या प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादीच्या कुडवा जि.प. क्षेत्राच्या सदस्या खुशबू टेंभरे यांनी सभेचे सदस्य सचिव असलेले महिला बालविकास अधिकारी अंबादे यांना सभेची वेळ का बदलली असा प्रश्न विचारताच सभापती श्रीमती नागपुरे या श्रीमती टेंभरे यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तुम्हाला काहीही विचारण्याचा अधिकार नाही,सभेला सुरवात करा आणि अधिकार्यांना सुध्दा तुम्हाला काही सांगायची गरज नाही असे म्हणत आपणास गेट आऊट म्हटल्याचे श्रीमती टेंभरे यांनी सांगितले. अधिकारी,कर्मचारी व समिती सदस्यांसमोर अपमानास्पद भाषेचा वापर करुन आपणास अपमानित करीत अधिकाराचा हनन केल्याची तक्रार विभागीय आयुक्तांना लेखी स्वरुपात पाठविली.त्या अगोदर राष्ट्रवादी काँँग्रेसच्या महिला सदस्यानी महिला बालकल्याण समितीच्या सभेचा बहिष्कार करीत जि.प.अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे यांचे कार्यालय गाठले.त्यावेळी खुशबू टेंभरे,ललीता चौरागडे,सुनिता मडावी व वीणा बिसेन यांनी जि.प अध्यक्षांना झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.यावेळी काँग्रेसचे काही जि.प.सदस्यही उपस्थित होते.
त्यामुळे अध्यक्षांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती यांच्याकक्षाकडे स्वत जाऊन झालेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.परंतु, सभापती त्यांचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे समोर आले.अध्यक्षांनाच सभापतींनी सदर सदस्या या बैठकीसाठी बनूनठणून आल्याचे सांगितल्याचे श्रीमती टेंभरे यांनी सांगितले.अध्यक्ष श्रीमती मेंढे यांनी मात्र प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न केले,परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनीही समाधानकारक मार्ग काढण्याबाबत सदस्यांची अध्यक्षांच्या कक्षात चर्चा केली. उल्लेखनीय म्हणजे विरोधी पक्षाचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांचाही एका साधारण सभेत नागपुरे यांनी एकदा पाणउतारा केल्याचे स्वत परशुरामकर यांनी बेरारटाईम्सला सांगितले.राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य कुंदन कटारे यांनीही सदर प्रकरण योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. प्राप्त माहितीनुसार, महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल व अलमारी खरेदी प्रकरणात सभापतींचे नातेवाइकांच्या असलेल्या हितसंबंधीविषयी सर्व सदस्यांत नाराजीचा सूर असल्याचे बोलले जाते. त्याचा राग सभापतीनी राष्ट्रवादीच्या सदस्यांवर काढल्याची चर्चा आहे.