विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेवून यशाची शिखरे गाठावी- उषा मेंढे

0
7

गोंदिया,दि.८ : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्व दयावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पुर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी असे आवाहन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
८ सप्टेबर रोजी आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशिलाबाई सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सिताबाई पाथोडे, उपसरपंच श्री.किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी घोषे, केंद्रप्रमुखरामटेके, रुम टू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर,पोलीस निरिक्षक श्री.सांडभोर उपस्थित होते.
श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते असेही मेंढे यावेळी म्हणाल्या.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात ५० ते ६० वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.सुशिलाबाई सूर्यवंशी बोलतांना म्हणाल्या, धनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खुप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमीत घ्यावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या.
तहसिल कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार, देशमुख, शाळेतील शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.