गोंदिया : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी ३०२ मते मिळवत विजय संपादन केला, तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मते मिळाली. भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या १४८ मताच्या फरकाने विजय झाला आहे.ब्राम्हणकर यांच्या विजयाने भाजपने ही जागा आपल्याकडे कायम ठेवली आहे. मात्र या निकालाइतकीच चर्चा महायुतीतील कथित मतफुटीची आणि निवडणुकीभोवती निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची रंगली.ही निवडणूक भाजपचे आमदार परिणय फुके आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई बनविले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनी निवडणुकीत उत्सुकतेची कमाल निर्माण केली होती.
काँग्रेसने अखेरच्या क्षणी आपले अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड आणि प्रफुल गोपालदास अग्रवाल यांचे अर्ज मागे घेत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयाने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.तेव्हाच ही निवडणूक महायुतीच्या पारड्यात गेलेली होती.महायुतीचे ब्राम्हणकर यांनी मताधिक्यानी विजय मिळवित काँग्रेस आमदार पटोलेंंच्या राजकारणाला सुरंग लावला आहे.





