34.2 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home राजकीय भाजपा देणार भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी प्रशासन जाहीरनान्याचे भाजपाने केले विमोचन

भाजपा देणार भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी प्रशासन जाहीरनान्याचे भाजपाने केले विमोचन

0
25

अमरावती,दि. 13 –-भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी प्रशासन आणि चौफेर विकासाची हमी देऊन भाजपा जनतेला मते मागणार आहे. तशी हमी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून दिली आहे. शहराची विद्यमान स्थिती आणि राजकीय वातावरण लक्षात घेता भाजपाला येणार्‍या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळले, असा दृढ विश्‍वास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व मनपा निवडणुकीचे प्रमुख आमदार सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपाने ‘अमरावतीकरांचा जाहीरनामा’ आणि ‘ गोल्डन गँग ’ चित्रफीतीचे विमोचन केले. त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी मंचावर शहराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य किरण पातुरकर, प्रा. रवींद्र खांडेकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, माजी महापौर मिलिंद चिमोटे, महिला आघाडीच्या अध्यक्ष रिता मोकलकर उपस्थित होत्या. आ. पुढे म्हणाले, विद्यमान सत्ताधारी नगरसेवकांनी स्वत:ला टक्केवारीत बांधून घेतले होते. त्यामुळे दर्जाहीन कामे शहरात झाली. भ्रष्टाचारही फोफावला. परिणामस्वरूप शहराचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. निर्माण झालेली हि परिस्थिती बदलविण्यासाठी भाजपाने भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी प्रशासन आणि अमरावतीच्या विकासाची हमी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. एकूण 75 उमेदवार भाजपाने विविध प्रभागातून उभे केले आहे. संघटीतपणे या सर्व उमेदवारांचा प्रचार सुरू असून प्रचार कार्यालये, प्रचार फेरी सुरू झाल्या आहे. शहराच्या विविध भागात कॉनर बैठकी व छोट्या सभा होणार आहे. त्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, शहराध्यक्ष जयंत डेहनकर व माझ्या नेतृत्वात टिम तयार करण्यात आली आहे. प्रचाराचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. तुलनेने इतर पक्ष कमजोर पडले असून आजमितीला भाजपाने प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे. अतिशय अनकुल वातावरण भाजपासाठी निर्माण झाले आहे. जनतेने आपले अमूल्य मत देऊन केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. केंद्रात आणि राज्यातही वेगाने विकासाचा झंझावात सुरू झाला. हीच विकासाची श्रुंखला अमरावती शहरात आणण्याचा निर्धार आ. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला विनोद कलंत्री, गंगा खारकर, अलका सप्रे व अन्य उपस्थित होते.