विष प्रयोग करुन बिबट्याची शिकार

0
31

गोंदिया : विष प्रयोग करुन बिबट्याची शिकार करण्यात आल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५६ मध्ये मंगळवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी वन विभागाने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार सडक अर्जुनी तालुक्यातील फुलेनगर येथील सुखनदास तोरणकर यांच्या गोऱ्याची पाच सहा दिवसांपूर्वी बिबट्याने शिकार केली होती. त्यांच्या शेतशिवारात नेहमीच बिबट्याचा वावर राहत हाेता.त्यामुळे त्यांनी शेताच्या परिसरात थिमेंट टाकले होते. हेच थिमेंट एका गाईने खाल्ले या गाईचे मांस बिबट्याने खाल्याने बिबट्याचा मृत्यु झाल्याचे बोलल्या जाते. बिबट्याच्या मृतदेह सडलेला असून त्याच्याजवळच एक जनावर सुध्दा मृतावस्थेत आढळले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयावरुन सुखनदास तोरणकर व संदीप तोरणकर या दोघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या गोऱ्याची शिकार झाल्याने थिमेंट टाकल्याची कबुली वन विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ दिल्याची माहिती आहे. मात्र मृतक बिबट्याचे पंजे आणि अवयव गायब असल्याने विष प्रयोग करुन बिबट्याची शिकार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता बिबट्याची विष प्रयोग करुन शिकार केल्याची शंका असल्याने त्या बाजुने सुध्दा तपास सुरु असल्याचे सांगितले.