२५ हजाराची लाच घेताना ग्रामीण पोलिस सहाय्यक निरीक्षकला रंगे हात पकडले

0
228

मिरज : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्ह्यात मिरजेतील डाॅक्टरांना आरोपी न करण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचा सहाय्यक निरीक्षक समाधान वसंत बिले (वय ४२, मूळ गाव खोमनाळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या रा. पोलीस कर्मचारी वसाहत, पंढरपूर रस्ता, मिरज) याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. बिले याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन वर्षांपूर्वी बेडग (ता. मिरज) येथे एकाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती. तिचा गर्भपात करून पोलिसांना माहिती न दिल्याने मिरजेतील दोन डाॅक्टरांनाही आरोपी करण्याची मागणी समाधान बिले याने न्यायालयाकडे केली होती. दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी यापैकी एका डाॅक्टरांकडे बिले याने एक लाखाची लाच मागितली होती.त्यानंतर तडजोडीने २५ हजारात प्रकरण मिटविण्याचे ठरले होते. जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.या विभागाने त्याची खात्री करून सापळा लावला. बुधवारी रात्री सातच्या दरम्यान मिरजेत हिरा हाॅटेल चाैकात रुईकर यांच्याकडून २५ हजार रुपये लाच घेतल्यानंतर बिले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करुन बिले यास अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती.