नोकरीचे आमिष दाखवून महिलेची परराज्यात विक्री ; दोन महिलेसह तिघांना अटक

0
18

चंद्रपूर-पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेस नोकरीचे आमिष दाखवून मध्यप्रदेश राज्यात विक्री केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली.राजुरा येथील रमाबाई वार्डातील आशाबाई कवडू रामटेके ऊर्फ माधुरी माणिकराव वाघमारे हिने आपल्या जुन्या संबंधातून ओळख झालेल्या महिलेला नागपूर येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. पतीसोबत पटत नसल्याने पीडिता विसापूर येथील नातेवाईकाकडे आली होती. यादरम्यान तिची आशाबाई वाघमारे हिच्याशी ओळख झाली.तिने पीडितेला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बल्लारपूर येथे भेटायला बोलावले व नागपूर येथे नोकरी लावून देतो, असे सांगून नागपूर नेण्याच्या बहाण्याने थेट उज्जैन येथे घेऊन गेली. तिथे प्रेम नावाच्या व्यक्तीने मदन अंबाराम राठीकडून १ लाख रुपये घेऊन पीडितेसोबत लग्न लावून दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने राजुरा येथे राहणाऱ्या मावशीला फोन करून घटनेबाबत माहिती दिली. यानंतर पीडितेच्या भावाने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उज्जैन गाठून आरोपी मदन अंबादास राठी, केसराबाई मंथन, अशाबाई कवडू रामटेके यांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.