भरधाव कारने पोलिसाला चिरडले,पोलिसाचा मृत्यू; सात जखमी

0
57

पारशिवनी-नयाकुंड सूतगिरणीजवळ कार व ट्रकची धडक झाली. यात एक जण जखमी झाला होता. त्या घटनेचा मोका पंचनामा सुरू असताना बुधवारी (२३ नोव्हेंबर) रात्री ८.१५ वाजता घटना घडली. एक भरधाव कार घटनास्थळी आली व तिने आठ लोकांना उडविले. यात एक पोलिस मृत पावला तर सात जण जखमी झाले. जयंत विष्णू शेरेकर (४२, राहणार रनाळा, कामठी), असे मृतकाचे नाव आहे. ते पारशिवनी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
चंद्रप्रकाश टेकाडे (३२, सूतगिरणी, नयाकुंड), अमोल कनोजे (३0, पारशिवनी), विक्रमसिंग भैस (४५, नयाकुंड), आकाश कोलांडे (२५, मेहंदी), संदीप तिजारे (३५, मेहंदी), गौरव पणवेलकर (३२, पारशिवनी), सागर सायरे (३८, पारशिवनी) हे जखमी आहेत. जखमींना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. आमडी फाटा ते पारशिवनी रस्त्यावरील नयाकुंड येथील सूतगिरणीपासून एक किमी अंतरावर सदर अपघात घडला. सुरुवातीला आमडी फाट्याकडून कार पारशिवनीकडे येत होती. अशातच पारशिवनीकडून आमडी फाट्याकडे जाणार्‍या ट्रकने कारला धडक दिली. यात कारचालक विक्रमसिंग भैस हा कारमध्ये अडकला. यानंतर घटनेची माहिती पारशिवनी पोलिस स्टेशनला देण्यात आली.
लगेच जयंत शेरेकर व एक पोलिस घटनास्थळी पोहचले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते गौरव पणवेलकर, अमोल कनोजे हे पोलिसांना मदत करण्याकरिता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी विक्रमसिंग यांना कारबाहेर काढले. यानंतर मृतकासह एक पोलिस मोका पंचनामा करू लागले. यावेळी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ट्राफिक जाम झालेली होती. त्यामुळे पोलिस व गौरव पणवेलकर, अमोल कनोजे हे रस्त्यावरील ट्राफिक सुरळीत करू लागले होते. यावेळी रस्त्यावर आणखी काही युवक होते. अशातच आमडी फाट्याकडून एक कार एम. एच. ४0 / के. एच. ६३९३ भरधाव वेगाने घटनास्थळाकडे ८.४५ वाजता आली. या कारने काही कळायच्या आत रस्त्यावर उभ्या असणार्‍या लोकांना उडविले व घटनास्थळावरून पळ काढला.
यावेळी कारने पोलिस जयंत शेरेकरसह इतरांना जोरात धडक दिली. लागलीच सर्वांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान जयंत शेरेकर यांचा मृत्यू झाला. यानंतर प्राथमिक उपचारानंतर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडविणारी कार पारशिवनी पोलिसांनी जप्त केली. परंतु, कारमधील व्यक्ती फरार आहेत. घटनेचे वृत्त समजताच नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहेत.